अभिनेता रितेश देशमुख आता ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवण्यास सज्ज झाला आहे. रितेश देशमुख ओटीटीवर पदार्पण करणार आहे. रितेशची मुख्य भूमिका असलेल्या 'पिल' या वेब सीरिजचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. फार्मा उद्योगातील काळी बाजू या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे.
'पिल' या वेब सीरिजमध्ये नफ्यासाठी लोकांचा जीव धोक्यात घालणारे फार्मा उद्योग, त्यांना मदत करणारी यंत्रणा यावर भाष्य करण्यात आले आहे. रितेश देशमुख या वेब सीरिजमध्ये प्रकाश चौहान या अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. भारतातील फार्मास्युटिकल जगताविषयी अनेक रहस्य दडली आहेत. या रहस्यांच्या मूळाशी जाण्याचा प्रयत्न प्रकाश चौहान करताना दिसणार आहे.फार्मा उद्योजक, भ्रष्टाचारी डॉक्टर्स ते मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, भ्रष्ट औषध नियामक प्राधिकरण अशी साखळी तर दुसऱ्या बाजूला लोकांचे प्राण वाचवण्यासाठी झटणारे आणि भ्रष्ट यंत्रणेच्या विरोधात लढणारे प्रामाणिक अधिकारी, सामान्य नागरीक असा संघर्ष या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. सत्य आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात संघर्ष करणारा प्रकाश चौहान यशस्वी होणार का, हे या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.
आपल्या भूमिकेबाबत बोलताना रितेश देशमुखने सांगितले की, “डिजिटल स्ट्रीमिंगच्या जगात पदार्पण करताना मला आनंद वाटतोय. आपलं दैनंदिन आयुष्य आणि एकूणच आरोग्यावर प्रचंड परिणाम करणारी एखादी गोळी ही खरंतर सामान्य बाब आहे. पण, त्यातील ही प्रचंड गुंतागूंत समजून घेणे फार औत्सुक्याचे होते. हा प्रवास बरंच काही शिकवणारा होता असे रितेशने सांगितले. फार्मा कंपन्यांमधील भ्रष्टाचाराविरोधातील ही लढाई प्रेक्षकांनाही आपलीशी वाटेल, असा विश्वासही रितेश देशमुखने व्यक्त केला.
कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर दिसणार रितेशची वेब सीरिज?
रितेश देशमुखची 'पिल' ही वेब सीरिज 12 जुलै पासून जिओ सिनेमावर स्ट्रीम होणार आहे. या वेब सीरिजमध्ये रितेश देशमुखशिवाय, पवन मल्होत्रा, अंशूल चौहान, राजकुमार गुप्ता, अक्षत चौहान आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. रॉनी स्क्रूवाला यांनी या वेब सीरिजची निर्मिती केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.