कोल्हापूर : पुणे पाठोपाठ कोल्हापुरातील 'हिट अॅण्ड रन'चा प्रकार आज घडला. भरधाव मोटारीने आठ जणांना उडवले. त्यातील तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. या घटनेने पाहणाऱ्यांचा थरकाप उडाला होता. पुणे येथे अलीकडेच पॉर्श कार अपघात प्रकरण गाजले होते. त्यानंतर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांवर मर्यादा लावली जावी अशी मागणी केली होती. मात्र आज दुपारी कोल्हापुरातील असाच हिट अॅण्ड रनचा प्रकार घडला. शिवाजी विद्यापीठाजवळ असलेल्या सायबर चौकामध्ये नेहमीच वर्दळ असते. या चौकातून जात असलेल्या एका मोटारीने चौकाच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला जात असताना सुमारे ५० मीटरच्या अंतरामध्ये चार वाहनांना उडवले.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार चार दुचाकी वाहनांवरून आठ जण प्रवास करीत होते. हे चौघेही भरधाव मोटारीच्या धडकेमध्ये पाल्या पाचोळ्यासारखे उडाले. यापैकी चौघांना सिटी रुग्णालयात दाखल केले असून चौघांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एक जण जागीच मृत्यू पावला होता. तर दुसरीही व्यक्ती मृत पावल्याचे सांगण्यात येते. आणखी काही जण दगावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर अपघात स्थळी एकच गर्दी झाली होती. अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना वाहनातून रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केली. काही वेळानंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. मोटारीची धडक इतकी जबरदस्त होती की रस्त्याकडेला असलेले लोखंडी संरक्षण कठडेही मोडून पडले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.