जत : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोसारी येथील सोसायटीचे माजी अध्यक्ष शंकर आप्पांना तोरवे (वय ५५) यांचा रविवारी भरदिवसा धारदार सुरीने भोसकून खून करण्यात आला. कोसारी येथील मरीआई देवळाच्या शेजारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा खून झाला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात अनैतिक संबंधाच्या संशयातून किंवा जमिनीच्या वादातून खून झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शंकर तोरवे यांचा धारदार सुरीने भोसकून तसेच सात ते आठ वेळा वार करुन खून करण्यात आला आहे. तीन ठिकाणी छातीवर तसेच बरगडी, मांडीवर तीन ठिकाणी हल्लेखोरांनी वार करुन खून केला आहे. घटनेची माहिती मिळताच जत पोलिस ठाण्यातील कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेथे जाऊन पंचनामा केला. त्यानंतर सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास जत ग्रामीण रूग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला.
या खुनाच्या प्रकरणात पाच ते सहा मारेकऱ्यांचा सहभाग असावा, असा अंदाज जत पोलिसांनी व्यक्त केला आहे. अनैतिक संबंधाचा संशय आणि जमिनीचा वाद काही दिवसांपासून सुरू होता. त्यातूनच ही घटना घडली असावी, असे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. खुनानंतर हल्लेखोर हे फरारी झाले असून त्यांच्या शोधासाठी जत पोलिस ठाण्याची दोन पथक तातडीने रवाना करण्यात आली आहेत. मृत तोरवे यांच्या पश्चात पत्नी, चार भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. मुलगा व मुलगी शिक्षण घेत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.