सांगली : पुण्यातील हुक्का पार्लरवरील कारवाईनंतर राज्यात हुक्का पार्लर चांगलेच चर्चेत आले आहेत. या हुक्का पार्लर प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील या प्रकरणानंतर मिरजेतील काही बारमध्ये तळीरामांना गांजाचे हुक्का उपलब्ध करून दिले जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. शिवाय काही बारमध्ये तर खुलेआम परवान्याशिवाय असे हुक्का ओढताना तळीराम दिसून येतात अशीही चर्चा आहे. त्या काही बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मेहरनजर का आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर हुक्का पार्लर, पब, पहाटेपर्यंत सुरू असणारे बार यावर राज्यात सातत्याने चर्चा होत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी तर विद्येच्या माहेरघराचे ड्रग्ज आणि पब्जचे माहेरघर झाल्याचा आरोपही केला आहे. पुण्यातील या घटनांनतर सांगली जिल्ह्यातील मिरज शहर आणि परिसरातील काही बारमध्ये खुलेआम गांजाचा हुक्का तळीरामांना उपलब्ध करून दिला जात असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. हुक्क्याची सोय उपलब्ध झाल्याने अनेक महाविद्यालयीन तरूण-तरूणींचा राबता अशा सेवा देणाऱ्या बारकडे वाढल्याचीही चर्चा आहे. गांजाचा हुक्का उपलब्ध करून देणाऱ्या बारवर मात्र राज्य उत्पादन शुल्कची मेहरनजर का आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अंमली पदार्थविरोधी १९८५ च्या कायद्यानुसार कारवाई करण्याचे अधिकार राज्य उत्पादन शुल्क विभागालाही आहेत. मात्र सांगली जिल्ह्यातील किरकोळ अपवाद वगळता राज्य उत्पादन शुल्क विभागाने अंमली पदार्थविरोधी फारशा कारवाया केल्या नसल्याचे दिसून येते. सध्या मिरजेतील काही बारबाबत सुरू असलेल्या चर्चा पाहता बारमध्ये कारवाई करण्याचे अधिकार फक्त उत्पादन शुल्क विभागालाच आहेत. तरीही हा विभाग गांधारीच्या भूमिकेत वावरत असल्याचा आरोप केला जात आहे. बारमध्ये हुक्का उपलब्ध केल्याबद्दल कारवाई करण्यात पोलिस प्रशासनाला मर्यादा येतात. त्यामुळे संबंधित बारवर कारवाई कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.मिरजेतील बारमधील हुक्क्यांसाठी जत तालुक्यातील तस्करांकडून गांजाचा पुरवठा केला जातो असेही बोलले जात आहे. शिवाय मिरज परिसरात येणारी केमिकलमिश्रीत ताडीही जत तालुक्यातील काही भागातून येत असल्याची चचार् आहे. युवापिढीला बरबाद करणाऱ्या या हुक्का संस्कृतीवर उत्पादन शुल्क विभाग कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.