मोठी बातमी: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना झारखंड हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. कथित जमीन घोटाळ्यात गेल्या अनेक दिवसांपासून हेमंत सोरेन हे अटकेत आहेत. हायकोर्टाकडून आता जामीन मंजूर करण्यात आल्याने सोरेन यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
झारखंडमधील भूमाफियांनी बेकायदेशीरपणे मालकीमध्ये बदल करून जमिनी हडप केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाने काही महिन्यांपूर्वी हेमंत सोरेन यांना अटक केली होती. या कारवाईमुळे सोरेन यांना मुख्यमंत्रिवरूनही दूर व्हावं लागलं होतं. या प्रकरणी ईडीने याआधी १४ जणांना अटक केली होती. यामध्ये आयएएस अधिकारी छवी रंजन यांचाही समावेश आहे.
ईडीने गेल्या वर्षी दावा केला होता की, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पंकज मिश्रा यांना राजकीय संरक्षण आहे, कारण ते झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे राजकीय प्रतिनिधी होते. तसेच, पंकज मिश्रा कथित बेकायदेशीर खाणकामात सहभागी होते. ईडीच्या म्हणण्यानुसार, या मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात ४७ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. यादरम्यान ५.३४ कोटी रुपयांची रोकड, १३.३२ कोटी रुपयांच्या बँक ठेवी, ३० कोटी रुपयांची एक बोट, पाच स्टोन क्रशर आणि दोन ट्रक जप्त करण्यात आले होते.
दरम्यान, जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने हेमंत सोरेन यांनाही अटक केल्यानंतर देशभरात राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका रंगली होती. आता हायकोर्टाने जामीन मंजूर केल्याने हेमंत सोरेन यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.