सांगली, रत्नागिरी शहर बससेवेत महिला, ज्येष्ठांना सवलतदर लागू
सांगली : ग्रामीण प्रमाणे महिला, ज्येष्ठ व वयोवृद्ध नागरिकांना सांगली व रत्नागिरीमधील शहरी बसच्या प्रवाशी भाड्यात सवलत लागू होणार आहे. याबाबतचा शासन आदेश शनिवारी जारी झाला असून, ही सवलत रविवारपासून (उद्या) लागू होणार आहे. शहरी बस वाहतुकीसाठी ज्येष्ठ नागरिक व महिलांना ५० टक्के तर ७५ वर्षांवरील प्रवाशांना शंभर टक्के सवलत योजना लागू होणार आहे.
यापूर्वी या सवलतीमधून शहरी बस सेवा वगळण्यात आली होती.राज्यातील एसटी महामंडळापुढे खासगी बसच्या प्रवासी वाहतुकीचे मोठे आव्हान असल्याने एसटी महामंडळ आर्थिक संकटात सापडले होते. यातून एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी महिलांसाठी ५० टक्के आणि ७५ वर्षांवरील नागरिकांना शंभर टक्के प्रवासी भाड्यात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे एसटीच्या उत्पन्नामध्ये भरीव वाढ झाली होती. मात्र, हा निर्णय केवळ ग्रामीण व लांब पल्ल्याच्या बस प्रवासासाठी होता.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने चालविण्यात येत असलेल्या सांगलीतील ४० आणि रत्नागिरीमधील १० बसमध्ये ग्रामीण भागाप्रमाणे प्रवासी सवलत योजना लागू करण्यात येत असल्याचा निर्णय राज्य शासनाने शनिवारी जाहीर केला. यानुसार शहरी बससेवेसाठी महिलांना ५० टक्के, ६५ ते ७५ वय असलेल्या नागरिकांना ५० टक्के आणि ७५ वर्षांवरील नागरिकांना बस प्रवास भाड्यात १०० टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.