"खिशात ७० रुपये असताना..."; मी नवखा नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांचे प्रत्युत्तर
कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत अर्थसंकल्पावर आणि आगामी विधानसभा निवडणुकांवर भाष्य केले. या अर्थसंकल्पाची गुप्तता पाळली गेली नाही आणि तो फुटला होता असा दावा शरद पवार यांनी केला. अर्थसंकल्पसंदर्भातली माहिती आधी बाहेर येता कामा नये. कारण त्याला अर्थसंकल्प फुटला असं म्हणतात. काल अर्थसंकल्प मांडण्यात आला. पण त्याच्या आदल्या दिवशीच्या वर्तमानपत्रांत अर्थसंकल्पात काय काय येणार आहे, ते छापून आलं होतं. अनेक गोष्टी विधानभवनात मांडण्यापूर्वीच बाहेर आल्या होत्या. याचा अर्थ स्पष्ट आहे की अर्थसंकल्पाची गुप्तता पाळली गेली नाही, असे शरद पवार म्हणाले.
दुसरीकडे, विरोधकांनी अर्थसंक्लपावर टीका केल्यानंतर अजित पवारांनी भाष्य केलं होतं. "मी काही आज अर्थसंकल्प सादर करत नाहीये. या सगळ्या गोष्टींमध्ये मी नवखा नाही. यावेळी मी दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडला आहे," असं विधान अजित पवार यांनी केलं होतं. माध्यमांनी शरद पवार यांच्याकडे अजित पवारांच्या 'मी काही नवखा नाही' विधानाबाबत विचारलं असता त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
"एखाद्या गोष्टीवर मी १०० रुपये खर्च करणार म्हटलो आणि माझ्या खिशात ७० रुपये आहेत, तर मग मी १०० रुपये खर्च कसे करणार? पहिला प्रश्न हा आहे की तुमच्याकडे महसुली जमा किती आहे? दुसरं महसुली खर्च किती होणार आहे? आणि जमेपेक्षा खर्चाची रक्कम अधिक असताना खर्चाचा फरक कसा भरणार? याची तरतूद न करता खर्च करणार म्हटलं आणि विचारपूर्वक केलं असं म्हटलं तरी त्याला फारसा काही अर्थ राहात नाही," असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.