माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी शनिवारी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मात्र, अवघ्या दोन दिवसानंतर आज (सोमवार)त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) प्रवेश करण्याची शक्यता आहे. मागील 10 वर्षांपासून सूर्यकांता पाटील या भाजपामध्ये काम करीत होत्या. 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. सूर्यकांता पाटील यांचा शरद पवार गटातील पक्षप्रवेश हा मुंबईत होण्याची शक्यता आहे.
सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या सोबत अनेक वर्षे काम केले होते. त्यांच्या कामाची पावती म्हणून शरद पवार यांनी पाटील यांना केंद्रीय ग्रामविकास राज्य मंत्रिपदी संधी दिली होती. परंतु 10 वर्षांपूर्वी भाजपची केंद्रात सत्ता आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवत सुर्यकांता पाटील यांनी भाजपात पक्ष प्रवेश केला होता.
भाजपात प्रवेशानंतर मागील 10 वर्षांपासून भाजपने पाटील यांना कोणतीही जवाबदारी दिली नाही.पक्षाच्या कुठल्याच निर्णय प्रक्रियेत पाटील यांना सहभागी करून घेतले जात नव्हते. महत्वाचे निर्णय घेतांना त्यांचे मत विचारात घेतले जात नव्हते. त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अखेर त्यांनी भाजप पक्ष सदस्यत्वाचा आणि हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा दिला.
नांदेडमध्ये फटका
नांदेड जिल्ह्यात सुर्यकांता पाटील यांची डॅशिंग नेत्या म्हणून ओळख आहे. त्यांच्या राजीनाम्याने नांदेड जिल्ह्यात भाजपचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच शरद पवार गटाची ताकत या भागात वाढणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.