लोकसभा निवडणुकीत शरद पवार गट आणि काँग्रेससाठी आम्ही प्रचार केला मात्र सांगलीसह अनेक ठिकाणी आमच्या उमेदवाराच्याविरोधातच काम केले. महाआघाडीतील दोन्ही पक्षांमुळे आमचे नुकसान झाले अन्यथा अधिक जागा जिंकल्या असत्या असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
पत्रपरिषदेला संबोधित करताना ते म्हणाले, सांगलीतील जागेवर काँग्रेस-शरद पवार गटाने आमच्यासाठी कामच केले नाही. एका बाजूने सत्ताधारी आमची कोंडी करायचे तर दुसरीकडे आघाडीतील पक्षाचे नेत्यांच्या कुरघोड्या सुरू होत्या. अशा परिस्थितीतही 9 जागांवर पक्षाचे खासदार विजयी झाले. ठाणे, कल्याण डोंबिवलीत संपूर्ण शासकीय यंत्रणा आमच्याविरोधात काम करत होती. केंद्राकडून सर्वात जास्त टार्गेट आम्हाला करण्यात आले होते. त्याचा फटका आम्हाला बसला. विधानसभा निवडणुकीत असा प्रकार होऊ नये यासाठी काळजी घेण्यासंदर्भात दोन्ही पक्षांशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.
विधानसभेतील जागावाटपावर लवकरच बैठक
शरद पवार यांच्या वक्तव्यावर निशाणा साधताना राऊत म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाच्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळाली. त्यामुळे कुणीही 'स्ट्राईक रेट'चा मुद्दा उपस्थित करून लोकसभेची भरपाई विधानसभेत करू असा प्रचार करू नये. लोकसभेत अनेक जागांवर गैरसमजाने मतदान झाले. विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीची लवकरच बैठक होणार आहे. त्या आम्हाला आक्षेप असणार्या मुद्यांवर चर्चा करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.