सांगली: जत तालुक्याचा त्रिभाजनाचा तिढा सुटणार कधी?, नागरिकांना त्रास
जत : जत तालुका हा क्षेत्रफळाने मोठा असल्याने संख व उमदी हे असे त्रिविभाजन करण्याचा तिढा सुटलेला नाही. त्यावर तोडगा काढून संख हा दुसरा तालुका जाहीर करण्याऐवजी त्या ठिकाणी केवळ अपर तहसील कार्यालय सुरू केले. मात्र, त्या ठिकाणी सुविधांची वानवा असल्याने ही तात्पुरती मलमपट्टी झाली आहे. त्यामुळे जत तालुक्यातील नागरिकांचा होणारा त्रास थांबलेला नाही. जतमधून उमदी तालुका वेगळा करण्याचा प्रश्न अधांतरीच आहे.
सांगली जिल्ह्यात जत तालुका हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. तालुक्यात १२३ महसुली गावे आहेत. लोकांची वेळेची व पैशाची बचत व्हावी म्हणून जत, संख व उमेदी असे तीन तालुके करण्याची मागणी आहे. हा प्रश्न गेल्या ५० वर्षांपासून प्रलंबित आहे. मधल्या काळात जतचे विभाजन करून शेगाव व उमदी तालुका करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला. मात्र, तोही शासन दरबारी पडून आहे. शेगाव तालुक्याचा प्रश्नही मागे पडला. मात्र, उमदी तालुका होण्यासाठी लोकांमधून पुन्हा मागणी होऊ लागली आहे.
उमदीकरांची प्रतीक्षा कायम..
उमदी तालुका होण्यासाठी स्वतंत्र तालुका कृती समितीच्यावतीने २०१७ साली जिल्हाधिकारी कार्यालयावर उमदी ते जत पायी मोर्चा काढण्यात आला. मात्र, उमदी तालुका न होताच संख येथे २०१८ साली अपर तहसील कार्यालयाची घोषणा करण्यात आली. यामुळे उमदीकर नाराज झाले. अजूनही उमदी तालुका व्हावा, यासाठी उमदीकर प्रतीक्षेत आहेत.
संखला अपुरे मनुष्यबळ..
संख येथे अपर तहसील कार्यालय सुरू झाले; मात्र या ठिकाणी सुविधांची वानवा आहे. मुळात पाटबंधारे खात्याच्या असलेल्या वसाहतीत अपर तहसील कार्यालय सुरू करण्यात आले. या विभागाच्या इमारती या जुन्या झाल्या असून, गळती वाढली आहे. पावसाळ्यात या इमारतीतून पाण्याची गळती सुरू असते. त्यामुळे महत्त्वाची कागदपत्रे भिजली तर याला जबाबदार कोण? अशी अवस्था झाली आहे. या ठिकाणी पाण्याचीही सोय नाही. अपुरे मनुष्यबळ असूनही त्या कर्मचाऱ्यांना निवासाची सोय नाही.
स्टॅम्प, तिकिटासाठी जतची वारी..
विलासराव जगताप हे आमदारपदी असताना संख अपर तहसीलदार कार्यालयाचे उद्घाटन २६ जानेवारी २०१८ रोजी झाले. त्या दिवसापासून तेथे कार्यालय सुरू झाले. कार्यालय सुरू झाल्यानंतर नागरिकांना स्टॅम्प व तिकिटासाठी जत येथेच जावे लागत आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून या ठिकाणी जत येथील दोघा स्टॅम्पव्हेंडरांना आलटून पालटून संख येथे जाऊन विक्री करण्याचे आदेश दिले. तरीही स्टॅम्पव्हेंडर या ठिकाणी हजर नसतात. या कार्यालयात कर्मचाऱ्यांचीदेखील वानवा आहे. नायब तहसीलदार एक, अव्वल कारकून एक, लिपिक एक पद, अशी प्रमुख पदे रिक्त आहेत. त्यामुळे आहे, त्या कर्मचाऱ्यांत संख अपर तहसील कार्यालयाचा कार्यभार सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.