Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, पाणीसाठ्यात वाढ

कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, पाणीसाठ्यात वाढ

सातारा : साताराजिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे २४ तासांत नवजा येथे १०० तर आतापर्यंत एकूण ९२० मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. त्यातच धरण क्षेत्रातही पाऊस सुरूच असल्याने कोयना धरणात आवक वाढल्याने पाणीसाठा १८ टीएमसीवर पोहोचला. साताऱ्यात मात्र पावसाची उघडझाप सुरू आहे. शनिवारी सूर्यदर्शनही झाले.

सातारा जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस वेळेत दाखल झाला. मागील तीन आठवड्यांपासून पाऊस हजेरी लावत आहे. पण सुरुवातीला दमदार पाऊस झाल्यानंतर मात्र, जोर कमी झाला आहे. त्यातच मध्यंतरी काही दिवस पावसाची दडीही होती. सध्या आठवड्यापासून पाऊस पडत असला तरी पश्चिम भागात म्हणावे असे पर्जन्यमान नाही. शनिवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद नवजा येथे १०० मिलीमीटरची झाली आहे. तर कोयनानगर येथे ७१ आणि महाबळेश्वरला ७८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

एक जूनपासून कोयनेला ६९८ आणि महाबळेश्वरमध्ये ६५४ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असला तरी अजून मोठ्या प्रमाणात जोर नाही. त्यामुळे धरणात पाण्याची आवक होत असलीतरी सावकाशपणे आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास धरणात ९ हजार ८८८ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरण पाणीसाठा १८.२६ टीएमसी झाला होता. टक्केवारीत हे प्रमाण १७.३५ आहे. तर धरणातील उपयुक्त पाणीसाठा १३.१४ टीएमसी इतका आहे.

पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, नवजासह कांदाटी खोऱ्यात पाऊस होत असल्याने ओढे, नाल्यांना पाणी वाहत आहे. कण्हेर, उरमोडी, बलकवडी, तारळी धरण क्षेत्रात पाऊस एकदम कमी आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. जुलै महिन्यात पावसाने जोर धरल्यानंतरच धरणसाठ्यात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सातारकर जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत...

सातारा शहरासह तालुक्यात मागील आठ दिवसांपासून पाऊस कमी आहे. त्यातच चार दिवसांपासून उघडझाप सुरू आहे. शनिवारी तर सकाळी रिमझिम पाऊस झाल्यानंतर सातारकरांना सूर्यदर्शन झाले. सातारा तालुक्यातही अजून म्हणावा असा पाऊस सुरू झालेला नाही. तर पूर्व भागात पावसाची पूर्ण उघडीप आहे. सध्या ढगाळ वातावरण तयार होत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.