दिल्लीतील कथित मद्य धोरण प्रकरणामध्ये ईडीच्या अटकेनंतर जामिनावर बाहेर आलेल्या मुख्ममंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे केजरीवाल यांना पुन्हा तुरुंगात जावं लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी २१ दिवसांचा अवधी देत जामीनावर सोडलं होतं. रविवारी अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागणार आहे. दुपारी ३ वाजता तिहार तुरुंगात जाऊन आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली. दुसरीकडे केजरीवालांच्या या निर्णयावर आता अभिनेते आणि भाजप नेते परेश रावल यांनी टोला लगावला आहे.
ईडीच्या अटकेनंतर सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी २१ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. यानंतर आता २१ दिवसांच्या जामीनाची मुदत शनिवारी संपली. त्यामुळे रविवारी अरविंद केजरीवाल हे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करणार आहेत. तुरुंगात जाण्यापूर्वी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले. मात्र आता बॉलिवूड अभिनेते आणि भाजप नेते परेश रावल यांनी या संपूर्ण प्रकरणावरुन केजरीवालांवार निशाणा साधला आहे. परेश रावल यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी तुरुंगात आठवणीने ब्रश नेण्यास सांगितले आहे.
परेश रावल यांनी एक्स सोशल मिडिया अकाऊंटवर एक पोस्ट करत केजरीवालांना टोला लगावला आहे. "अरविंद जी आशा आहे की तुम्ही तुमची बॅग भरली असेल? टूथब्रश विसरू नका कारण तुम्ही तुमचे तोंड स्वच्छ ठेवणे खूप महत्वाचे आहे!," असा खोचक टोला परेश रावल यांनी लगावला आहे.
दरम्यान, दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री केजरीवाल दुपारी तिहार तुरुंगाकडे रवाना होतील. याआधी त्यांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानत एक ट्वीट केलं आहे. 'माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मी २१ दिवस निवडणूक प्रचारासाठी बाहेर पडलो. माननीय सर्वोच्च न्यायालयाचे खूप खूप आभार. आज मी तिहारला जाऊन शरण जाईन. मी दुपारी ३ वाजता घरून निघेन. सर्वप्रथम मी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहणार आहे. तेथून मी हनुमानजींचा आशीर्वाद घेण्यासाठी कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात जाईन आणि तेथून मी पक्ष कार्यालयात जाऊन सर्व कार्यकर्त्यांची आणि पक्षाच्या नेत्यांची भेट घेणार आहे. तेथून मी पुन्हा तिहारला जाईन," असे केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.