डॉक्टरच्या घरात घुसला; चोरी केली अन् तिथेच झोपी गेला चोर, सकाळी डोळे उघडताच..
लखनऊ : चोरीचं एक अतिशय अजब प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. यात एका मद्यधुंद चोरट्याने चोरीच्या उद्देशाने एका बंद घरात प्रवेश केला. यानंतर घरातील साहित्य गोळा केलं आणि शेवटी तिथेच झोपी गेला. सकाळी त्याला जाग आली तेव्हा समोर पोलीस उभे होते. पोलिसांनी चोर कपिल कश्यपला अटक करून तुरुंगात पाठवलं आहे. हे प्रकरण लखनऊमधील इंदिरानगर परिसरातील आहे.
हे संपूर्ण प्रकरण इंदिरा नगर भागातील आहे. येथे शनिवारी रात्री डॉ.सुनील पांडे यांच्या घरी ही चोरी झाली. डॉ.पांडे या घरात राहत नाहीत. त्यामुळे घर बंद होते. शनिवारी मध्यरात्री चोर कपिल कश्यपने दारूच्या नशेत घर फोडलं. कपिलने घरात ठेवलेल्या मौल्यवान वस्तू गोळा केल्या आणि नंतर तिथेच झोपी गेला. सकाळी कुलूप तुटलेलं पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. पोलीस आल्यावर चोर झोपेतून जागा झाला. त्याच क्षणी त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कपिलवर यापूर्वीही चोरीचे सहा गुन्हे दाखल आहेत. एसीपी गाझीपूर विकास जैस्वाल यांनी सांगितलं की, इंदिरानगर बी ब्लॉकमधील डॉ. सुनील पांडे यांच्या बंद घरात चोरट्याने चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला होता. चोरी केल्यानंतर चोर तिथेच झोपला. रविवारी सकाळी शेजाऱ्यांनी पाहिलं असता घराचा दरवाजा उघडा आणि कुलूप तुटलेलं दिसलं. आत गेल्यावर त्यांना एक मुलगा झोपलेला दिसला. त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून चोर कपिलला अटक केली.
एसीपींने दिलेल्या माहितीनुसार, समदीपूर गावात राहणारा कपिल कश्यप दारूच्या नशेत असताना चोरीच्या उद्देशाने आत आला होता. चोरी केल्यावर तो थोडावेळ आराम करण्यासाठी झोपी गेला. कपिलने गिझर, एसी वगैरे घेण्यासाठी घराची तोडफोडही केली होती. चोरीनंतर चोर घरात झोपल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.