मुंबई : लोकसभा निवडणुकीमुळे मुदतवाढ देण्यात आलेले मुख्य सचिव डॉ. नितीन करीर हे उद्या, 30 जून रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे आता मुख्य सचिव म्हणून आयएएस अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात येणार असून हे पद भूषविणाऱ्या त्या राज्याच्या पहिला महिला असतील.
येत्या 24 तासांत त्यांच्या नियुक्तीचे पत्र सरकारकडून काढण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, शनिवार आणि रविवारी मंत्रालयाला सुट्टी असल्याने मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांचा निरोप समारंभ काल, शुक्रवारी झाला.
मुख्य सचिव नितीन करीर 31 मार्च रोजी निवृत्त होणार होते. 31 डिसेंबर 2023 रोजी त्यांची या पदावर नियुक्ती झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने नितीन करीर यांच्या मुतदवाढीचा प्रस्ताव दिलेला नव्हता. राज्य सरकारने सुरुवातीला मुख्य सचिवपदासाठी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवला होता. आयोगाने हा प्रस्ताव फेटाळून तीन अधिकाऱ्यांच्या नावाची शिफारस करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सुजाता सौनिक, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव आय. एस. चहल आणि महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार मीना यांची शिफारस करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगाने ही शिफारस विचारात न घेता डॉ. करीर यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली.सेवाज्येष्ठतेनुसार 1987च्या बॅचच्या आयएएस आणि गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव असलेल्या सौनिक यांच्यापाठोपाठ 1988च्या बॅचचे अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) राजेश कुमार मीना आणि 1989च्या बॅचचे अतिरिक्त मुख्य सचिव (मुख्यमंत्री कार्यालय) इकबालसिंह चहल हे अधिकारी मुख्य सचिवपदाच्या शर्यतीत आहेत. सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक सध्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार आहेत. सुजाता सौनिक यांच्या नियुक्तीमुळे राज्याच्या मुख्य सचिवपदी प्रथमच महिलेला संधी मिळेल. यापूर्वी गृहसचिव या पदावर असलेल्या चंद्रा अय्यंगार, चित्कला झुत्शी, मेधा गाडगीळ या तिघीही सेवाज्येष्ठतेनुसार मुख्य सचिव पदाच्या दावेदार होत्या. पण त्यांना संधी मिळू शकली नाही.
कोण आहेत सुजाता सौनिक?
सुजाता सौनिक यांनी आपले शैक्षणिक तसेच महाविद्यालयीन शिक्षण चंदिगडमध्ये पूर्ण केले. त्यांनी इतिहास विषय घेऊन पंजाब विद्यापीठातून मास्टर्स केले आहे. आपल्या 37 वर्षांहून अधिकच्या कारकिर्दीत सामान्य प्रशासन विभाग तसेच कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम केले आहे. याशिवाय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गृह विभाग, राज्य सरकारच्या सल्लागार तसेच सहसचिव म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
मुख्य सचिवपद भूषवणारे पहिले दाम्पत्य?
सुजाता सौनिक राज्याच्या मुख्य सचिव झाल्यास इतिहास घडणार आहे. सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक एप्रिल 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत राज्याचे मुख्य सचिव होते. निवृत्तीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव म्हणून मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुजाता सौनिक यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्यास राज्याचे मुख्य सचिवपद भूषविणारे सौनिक हे देशातील पहिले दाम्पत्य असेल. सुजाता सौनिक मुख्य सचिव झाल्यास सुमारे सव्वा वर्षाचा कार्यकाळ सौनिक यांना मिळणार आहे. जून 2025 अखेरीस त्या निवृत्त होतील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.