इंडिया आघाडीने नितीश कुमारांना पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती, असा खुलासा जेडीयूचे नेते केसी त्यांगी यांनी केला आहे. परंतु नितीश कुमारांनी मोदींना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे, असंही त्यागी म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या जागा कमी झालेल्या असल्या तरी प्रत्यक्षात एनडीएकडे स्पष्ट बहुमत आहे. एनडीएमध्ये पुन्हा नव्याने सहभागी झालेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे कायम संशयाने बघितलं जातं. परंतु त्यांनी मोदींना पाठिंबा दिला आहे.
त्यापूर्वी त्यांना इंडिया आघाडीने पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती, असा खुलासा जनता दल युनायटेडचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा खुलासा केला. परंतु जेडीयूने तो प्रस्ताव फेटाळल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.केसी त्यागी म्हणाले की, निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर इंडी आघाडीने नितीश कुमारांना ऑफर दिली. परंतु जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत होतो तेव्हा त्यांनी नितीश कुमार यांना संयोजक केलं नाही. पण आज तेच लोक पंतप्रधान पदाची ऑफर देत आहेत. मात्र आता आम्ही पूर्ण ताकदीने एनडीएमध्ये आहोत, अशी स्पष्टोक्ती त्यांगींनी दिली.
दरम्यान, शुक्रवारी दिल्लीत भाजपच्या संसदीय समितीची बैठक पार पडली. नवनियुक्त खासदारांसह एनडीएमधील घटकपक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठकीला उपस्थिती होती. संसदीय समितीच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड झाली. नितीश कुमार यांनीही आम्ही कायम तुमच्यासोबत आहोत, असं म्हणत मोदींना पाठिंबा दिला.
एनडीएच्या बैठकीत नितीश कुमार काय म्हणाले?
नितीश कुमार म्हणाले की, मोदी दहा वर्षांपासून पंतप्रधान आहेत. या निवडणुकीत ज्या काही जागा जिंकायच्या राहिल्या आहेत त्या पुढच्या निवडणुकीत पूर्ण होतील. आम्ही पूर्णपणे मोदींच्या पाठिशी राहू..जे काही इकडे-तिकडे लोक निवडून आले आहेत, ते पुढच्या निवडणुकीत पडतील.इंडिया अलायन्सला उद्देशून बोलताना नितीश कुमार म्हणाले की, त्यांनी आजपर्यंत काहीही काम केलेलं नाही. परंतु तुम्ही (नरेंद्र मोदी) देशाची खूप सेवा केली आहे. विरोधकांना संधी मिळाली आहे परंतु इथून पुढे त्यांनी कुठलीच संधी मिळणार नाही.. आता मोदींच्या नेतृत्वामध्ये देश पुढे जाणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.