कोल्हापूरचे जेष्ठ उद्योजक शिरीष सप्रे यांचा हृदयविकाराने मृत्यू
कोल्हापूर : मॉर्निंग वॉकला गेलेले जेष्ठ उद्योजक शिरीष उर्फ प्रमोद विनायक सप्रे (वय.६८, रा. नागाळा पार्क, कागलकर हाऊस शेजारी, मुळ गाव तारळे, ता. राधानगरी) यांचे बुधवारी सकाळी सातच्या सुमारास सेंट झेवियर्स स्कूल समोर ह्रदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने शिरोली औदयोगिक वसाहतीतील यश ग्रुप आणि संपूर्ण उद्योग जगतात शोककळा पसरली.
शिरोली औद्योगिक वसाहतीमधील यश मेटॅलिक्स प्रा. लि., सप्रे ऑटो ॲन्सलरीज (मशीनिंग विभाग), सप्रे ऑटोकस्ट प्रा. लि. या नावाने मोठे उद्योग आहेत. हजारो लोकांना या यश ग्रुपच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. सामाजिक क्षेत्रातही त्यांनी अनेक गरजूंना मदतीचा हात दिला आहे. अनेक वाचनालयांना त्यांनी मदत केली आहे.
ते रोज सकाळी ७ वाजता मॉर्निंग वॉकला मित्रांसोबत बाहेर पडायचे घरापासून सेंट झेवियर्स, जिल्हाधिकारी कार्यालय, केळवकर हाॅस्पिटल, अजिंक्यतारा, धैर्यप्रसाद, यामार्गावरुन फिरुन यायचे, बुधवारी सकाळी ६ ३० वाजता नेहमीप्रमाणे ते माॅर्निंग वॉकला बाहेर पडले. चालत असताना सेंट झेवियर्स येथून जात असताना त्यांना अचानक छातीत कळा आल्या आणि जागीच कोसळले.
त्यांच्या सोबत असणाऱ्या मित्रांनी त्यांना तात्काळ केळवकर हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी सुष्मिता सप्रे, मुलगी, राजश्री सप्रे जाधव, जावई आदित्य जाधव, भाऊ उद्योजक पद्माकर सप्रे, असा परिवार आहे. अंत्ययात्रा आज बुधवारी दुपारी २.३० वाजता राहत्या घरातून निघणार आहे. अंत्यविधी पंचगंगा नदी घाटावर होणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.