Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हॉटेलमधील वेटरच्या बँक खात्यांतून डॉलर खरेदी; १४ लाखांची फसवणूक, नाशिकमधून दोघांना अटक

हॉटेलमधील वेटरच्या बँक खात्यांतून डॉलर खरेदी; १४ लाखांची फसवणूक, नाशिकमधून दोघांना अटक

मुंबई : पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली कुलाब्यातील एका महिलेची १४ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात दक्षिण सायबर पोलिसांनी नाशिकमधून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी हे विविध हॉटेलमधील वेटर आणि त्यांच्या मित्रांना पैसे देत व फसवणुकीसाठी त्यांच्या बँक खात्यांचा वापर करत होते. नंतर ते खात्यांतील रकमेतून अमेरिकन डॉलर खरेदी करून ते परदेशातील ठगांना पाठवत असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ मे रोजी कुलाबा येथे राहणाऱ्या एका महिलेच्या तक्रारीवरून दक्षिण विभाग सायबर पोलिस ठाणे येथे फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. या महिलेला आरोपींनी २८ फेब्रुवारी ते १ मार्च २०२४ दरम्यान व्हॉटसॲप क्रमांकावर विविध आयडीचा वापर करत पार्ट टाइम जॉबबाबत संदेश पाठवले. पार्ट टाइम जॉबच्या नादात त्यांची १४ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.

तपासादरम्यान, आरोपींनी या महिलेला विविध खात्यांवर पैसे टाकण्यास सांगितले होते. त्यापैकी फेडरल बँक खातेधारकाचा शोध घेऊन पुढील तपास केला असता खातेधारक हा नाशिक येथील हॉटेलमध्ये वेटर असल्याचे समोर आले.

बँक खात्याचा गैरवापर -

पथकाने वेटरला ताब्यात घेत चौकशी करताच, त्याने त्याचे खाते नाशिकमधील एका तरुणास वापरण्यास दिल्याचे सांगितले. अधिक तपासात, आरोपींनी नाशिक व परिसरातील विविध हॉटेल्समध्ये काम करणारे व त्यांचे मित्र यांच्या नावाचा वापर करून अनेक खाते उघडल्याचे व त्यांना बँक खात्याचा वापर करून अमेरिकन डॉलर खरेदी केले. ते परदेशातील आरोपींना दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटक केली आहे.

१) गुन्हे शाखेने नाशिकमधून हिमांशू रवींद्र मोरे (२१) आणि प्रेम दादाजी शेवाळे (१८) या दोघांना अटक केली आहे.

२) आरोपींकडून वेगवेगळ्या बँकांचे २९ डेबिट कार्ड, २८ बँक खात्यांचे पासबुक व वेलकम कीट लेटर, वेगवेगळ्या कंपन्यांचे ८ सिम कार्ड, ८ विविध कंपन्यांचे मोबाइल फोन जप्त केले आहेत.

३) नागरिकांनी पार्ट टाइम जॉब, गुंतवणूक व अन्य जास्त परतावा / पगार मिळवून देण्याच्या आमिषाला बळी पडू नये व ऑनलाइन फसवणूक झाल्यास १९३० या क्रमांकावर तत्काळ तक्रार करावी, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

दुबईत मुख्य सूत्रधार-

दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनखाली ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणाचा तपास करताना पोलिसांचे एक पथक माओ, दुसरे पथक सुरत आणि तिसरे पथक नाशिक येथे पाठवण्यात आली होती.

सायबर गुन्हेगारांना बँक खात्यांचा पुरवठा करणाऱ्या दोन आरोपींना मागमूस नाशिकच्या पथकाला लागला आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी दुबईत असून तो एका पाकिस्तानी व्यक्तीकडे मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार, अधिक तपास सुरू आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.