लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले आहेत. आतापर्यंत हाती आलेले निकाल अनेकांना धक्का देणारे आहेत. भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीत त्यांना ४०० हून अधिक जागा मिळतील असा दावा केला होता. तसेच बहुसंख्य एक्झिट पोल्समध्ये भाजपाला ३४० ते ३७० जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार भाजपाप्रणित एनडीएला २९३ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीला २३३ जागांवर आघाडी मिळाली आहे. एक्झिट पोल्समध्ये इंडिया आघाडीला १०० ते १३० जागा मिळतील असे अंदाज वर्तवण्यात आले होते. मात्र दुपारी दोन वाजेपर्यंतच्या निकालांनी सर्व एक्झिट पोल्स चुकीचे ठरवले आहेत.
दरम्यान, भाजपाला बहुमत मिळणार नाही असं चित्र दिसू लागल्यामुळे भाजपा नेत्यांचे धाबे दणाणले आहेत, तर भाजपाचे मित्रपक्ष आणि इंडिया आघाडीतील लहान पक्षांचे भाव वधारले आहेत. अशातच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि इंडिया आघाडीतील प्रमुख नेते शरद पवार यांनी संयुक्त जनता दलाचे प्रमुख तथा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिल्याची चर्चा रंगू लागली आहे. नितीश कुमार हे सध्या भारतीय जनता पार्टीबरोबर एनडीएत आहेत. ते काही महिन्यांपूर्वी इंडिया आघाडीतून बाहेर पडून एनडीएत दाखल झाले होते. मात्र इंडिया आघाडी निर्माण करण्यात नितीश कुमार यांचंही
योगदान होतं. अशातच भाजपाला बहुमत मिळणार नसल्याचं चित्र स्पष्ट होऊ लागताच शरद पवारांनी नितीश कुमार यांना दिलेल्या ऑफरच्या वृत्तामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दुसऱ्या बाजूला, बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते सम्राट चौधरी हे काही वेळापूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेले होते. मात्र, नितीश कुमार जेवण्यासाठी निघून गेले. त्यामुळे सम्राट चौधरी आणि नितीश कुमार यांची भेट होऊ शकली नाही, असं वृत्त एबीपी न्यूजने दिलं आहे. नितीश कुमार हे आता भाजपाशी चर्चा न करता इंडिया आघाडीशी किंवा शरद पवार यांच्याशी चर्चा करू शकतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.