एक लाखांची लाच घेताना महिला समाजकल्याण अधिकाऱ्याला अटक दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी निरीक्षक ताब्यात, सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
सांगली : नामांकित इंग्रजी निवासी शाळांना धनगर समाजातील मुलांना शिक्षण देण्यासाठी मंजूर झालेल्या अनुदानाच्या दहा टक्के प्रमाणे सहा लाख रूपयांची लाच मागून एक लाखांची लाच घेताना सांगलीच्या प्रभारी महिला समाजकल्याण अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले. तर अनुदानाचा धनादेश दिल्यायाप्रकरणी दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी समाजकल्याण निरीक्षकाला अटक करण्यात आली. बुधवारी दुपारी सांगलीतील समाजकल्याण कार्यालय परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
सपना सुखदेव घोळवे (वय ४०), निरीक्षक दीपक भगवान पाटील (वय ३६) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील घोळवे या सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी असून त्यांच्याकडे सांगलीतील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक पदाचा कार्यभार आहे. तक्रारदार यांच्या संस्थेला शासनामार्फत भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरांतील इंग्रजी माध्यमांना नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजने अंतर्गत ५९.४० लाखांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या अनुदानाचा पहिला हप्ता २९.७० लाख तसेच दुसरा हप्ता २९.७० लाखांचा हप्ता देण्यासाठी एकूण रकमेच्या दहा टक्के म्हणजेच सहा लाख रूपयांची लाच घोळवे यांनी तक्रारदारांकडे मागितली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर प्रभारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी सपना घोळवे यांनी सहा लाखांची मागणी करून तडजोडीअंती अडीच लाख रूपयांची मागणी करून त्यातील एक लाख रूपये तातडीने घेऊन येण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बुधवारी दुपारी श्रीमती घोळवे यांना एक लाख रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. तर समाजकल्याण निरीक्षक दीपक पाटील यांनी अनुदानाचा धनादेश दिल्याच्या बदल्यात दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी दोघांविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. शासकीय, निमशासकीय अधिकारी, कमर्चाऱ्यांनी लाचेची मागणी केल्यास माझ्याशी थेट 9821880737 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाने निरीक्षक दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे, प्रितम चौगुले, अजित पाटील, राधिका माने, ऋषीकेश बडणीकर, सलीम मकानदार, धनंजय खाडे, चंद्रकांत जाधव, उमेश जाधव, अतुल मोरे, सीमा माने, पोपट पाटील, रामहरी वाघमोडे, राधिका माने, वीणा जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.