Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

देवेंद्र फडणवीस लवकरच उपमुख्यमंत्रीपदापासून मुक्त होणार?

देवेंद्र फडणवीस लवकरच उपमुख्यमंत्रीपदापासून मुक्त होणार?


महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे आता भाजपच्या गोटात जोरदार हालचाली घडत आहेत. भाजपकडून प्रत्येक मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे.
महायुतीचा पराभव झालेल्या 33 लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून निरीक्षक नेमण्यात आले आहेत. या निरीक्षकांना येत्या 22 जूनपर्यंत त्या-त्या मतदारसंघाचा आढावा घेऊन भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपर्यंत अहवाल पाठवायचा आहे. महाराष्ट्रात आगामी काळात विधानसभेची निवडणूक असणार आहे. या निवडणुकीसाठीच भाजपने आता मोठा धसका घेतला आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात लोकसभेत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्रीपदापासून दूर होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठीदेखील गेले होते. पण त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला नव्हता. या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत विचार केला जाईल, असं पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांना सांगितलं होतं.

देवेंद्र फडणवीस सरकारमधून बाहेर पडण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे आता दिल्लीत त्यांच्या या निर्णयाबाबतचा फैसला होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे फडणवीस आज संध्याकाळी दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी नागपूर येथून दिल्लीच्या दिशेला रवाना होणार आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

देवेंद्र फडणवीस आज रात्री दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीत महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार आता लवकरच होण्याची शक्यता आहे. विधीमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात काही मंत्र्यांची बढती होण्याची शक्यता आहे. तर काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे. तसेत काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. याच बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतचा निर्णय होतो का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

फडणवीस उपमुख्यमंत्रीपदापासून मुक्त होणार?
देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारीतून मुक्त होऊन राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आधी संवाद यात्रा काढायची आहे. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाण्याची इच्छा आहे. त्यामुळे त्यांना सरकारमधून बाहेर पडायचं आहे. पण भाजपच्या राज्यातील नेत्यांना ते मान्य नाही. फडणवीस यांनी सरकारमध्ये राहून जनसंवाद यात्रा काढावी. सरकारमध्ये राहूनही पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी काम करता येऊ शकतं, असं पक्षातील इतर नेत्यांचं म्हणणं आहे. देवेंद्र फडणवीस आज रात्री दिल्लीत वरिष्ठांची भेट घेणार आहेत. या भेटीत त्यांच्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, फडणवीस भाजपच्या उद्याच्या आढावा बैठकीतही सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.