Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

‘सत्ता-नाट्याचा’ तिसरा अंक... - मधुकर भावे

‘सत्ता-नाट्याचा’ तिसरा अंक... - मधुकर भावे


श्री. नरेंद्र मोदी यांच्या ‘सत्ता-नाट्याचा’ तिसरा अंक सुरू झाला. २०१४, २०१९ असे दोन अंक देशाने पाहिले आहेत. तिसऱ्या  अंकाची सुरुवात होण्यापूर्वी,  या नाट्यातील नायकाने देशाच्या संविधानाची प्रत हातात घेवून त्यावर मस्तक टेकले... नेहमीप्रमाणे अँगलने कॅमेरे लावलेलेच होते. २०१४ आणि २०१९ ला पंतप्रधान होण्यापूर्वी हे फोटो पहायला मिळालेले नव्हते. तिसऱ्या नाट्याची सुरुवात होताना हा प्रवेश फार वेगळा होता. अनपेक्षित होता आणि तो प्रवेश  मतदारांनी दिलेल्या जबरदस्त तडाख्यातून होता. शिवाय यापूर्वीच्या दोन नाट्यांत.... ‘मोदी-मोदी’, ‘भाजपा-भाजपा’ असा गजर होता. तिसऱ्या नाट्याची सुरुवात झाली तेव्हा ‘मोदी’ आणि ‘भाजपा’ ही नावे गायब झाली. पहिल्या दोन नाट्यांत ‘एनडीए’ सामील होतेच. पण त्यांची नावे घेण्याची गरज नव्हती. कारण मोठे बहुमत होते. त्यामुळे ते अडगळीत पडलेले होते. आता बहुमत नाही. 

आता भाजपाची स्थिती अडगळीत पडल्यासारखी झाली. त्यामुळे एनडीएचा गजर सुरू झाला. मोदींमधील १० वर्षांतील अहंकारी व्यक्तिमत्त्वाला हा पहिला तडाखा देशातील लाखो मतदारांनी दिलेला आहे. ‘चारसौ पार’ या आकड्यावरून भाजपाचे फक्त १६१ खासदार कमी झाले. दुसऱ्या नाट्याच्या वेळी असलेल्या ३०३ आकड्यातील ६३ खासदार कमी झाले. (चारसौ पार हा आकडा फक्त एकाच सात्विक आणि लोकप्रिय चेहऱ्याला मतदारांनी दिलेला आहे, त्याचे नाव राजीव गांधी... जागा ४०४, ४९.१० टक्के, मिळालेली मते ११,५४,७८,२६७)
देशातील सामान्य मतदाराच्या डाव्या हाताच्या अंगठ्या शेजारचे, शाई लावलेले बोट हे किती पोळून टाकू शकते, ते चटके खुद्द पंतप्रधानांना अजूनही जाणवत आहेत. भाजपावाले त्यामुळे चिडीचूप आहेत. जर ‘चारसौ-पार’ झाले असते तर देशात थैमान घातले गेले असते. शहाण्या मतदारांनी या सगळ्यांनाच हवेतून जमिनीवर आणून उभे केले. त्यामुळे­­­­ भाषा बदलली... अिभनय बदलला... सगळे कथानकच बदलून गेले... असा हा सामान्य मतदाराचा या नाट्यातील कथानकात केवढा मोठा सहभाग... म्हणून या देशातील लोकशाही जिवंत ठेवणाऱ्या त्या सामान्य मतदाराला संविधानाचे महत्त्व जास्त कळते. आणि उन्मत्त सत्ताधिशांना त्या संविधनावर डोके टेकावे लागते. हा या मतदारांचा मोठा प्रभाव आहे. म्हणून तिसऱ्या नाट्याचा खरा नायक सामान्य मतदार आहे. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, याबद्दल कोणालाही दु:ख नाही... मतदारांनी त्यांना २४० पर्यंत पोहाेचवले. सर्वात मोठा पक्ष त्यांचा आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेले अन्य पक्षांचे पाठबळ त्यांना आहे. त्यामुळे लोकशाहीच्या तरतूदीनुसार त्यांच्याजवळ आज बहुमत आहे. त्यामुळे ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, हे सगळे रितसर झाले. पण ते होत असताना मतदारांनी ते घडवून आणले. सहजासहजी हा बदल झालेला नाही, हे सगळ्यात महत्त्वाचे. आता सरकार कसे चालेल.... किती चालेल... घटक पक्षांना किती विचारले जाईल.... 
लोकशाहीचा आधार ‘चर्चा’ आहे... कोणताही प्रश्न चर्चेतून सुटतो... शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकताना मोदी-शहांनी रस्त्यावर खिळे ठोकलेले पत्रे अंथरले आणि पंजाबच्या शेतकऱ्यांचे शांततेतील आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला होता. आता ती हिम्मत त्यांच्यात राहिलेली नाही. ते पुन्हा पंतप्रधान झाले... आता त्यांना मागच्या १० वर्षांतील त्यांचे सगळे अहंकारी वागणे बदलावेच लागेल...  काल एक छान व्यंगचित्र फिरत होते.. ई.डी., सी.बी.आय.चे अधिकारी आनंदात पार्टी करीत आहेत. आणि सांगत आहेत की, ‘आम्ही सुटलो बुवा... आता काही महिने तर नक्की आराम आहे.’ छोट्या-छोट्या व्यंगचित्रांनी मोदी सरकारच्या वागण्यातील विसंगतीचे कपडे फाडलेले अाहेत. आता चॅनवरील आरत्या बंद होतील. एकुणच गुणात्त्मक फरक झालेला आहे. आणि तो चांगला फरक आहे. ‘गांधी’ चित्रपटामुळे महात्मा गांधी सगळ्यांना माहिती झाले, असा शोध-निबंध लिहिणाऱ्या पंतप्रधानांनी महात्मा गांधी यांच्या समाधीवर जाऊन त्यांना नमस्कार केला. हा ही फार मोठा गुणात्मक बदल आहे. नवीन मंत्रिमंडळ आता झाले आहे. आता मोदी-शहा यांच्यापुरते ते मर्यादित नाही. तसा प्रयत्न झाला तर चंद्राबाबू आणि नितीशकुमार हे राजकीय लोणच्यात मूरलेले कसे नाचवतील, तेही पाहता येईल. पण आता राजकारण नको... लोकांच्या प्रश्नावर लक्ष देवून सरकार व्यवस्थित चालू द्या. 

श्री मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी अत्यंत संयमीत आणि मुद्देसुद भूमिका घेवून काँग्रेसला उभे केले आहे. बहुमत मिळाले नसताना सरकार बनवण्याचा प्रयत्न करणार नाही, असा त्यांनी जाहीर केलेला निर्णय अत्यंत शहाणपणाचा होता आणि आहे...  ९९ जागा हा काँग्रेसचा आकडा दुपट्टीने वाढला असला तरी ‘जनमताचा आदेश काँग्रेसने विरोधी बाकावर बसावे,’ असाच आहे. श्री. खरगे यांनी पक्षातील खासदारांसमोर अतिशय नेमकी भूमिका मांडली. आता लोकसभेत कायदेशीर मार्गाने राहुल गांधी विरोधी पक्षनेते होऊ शकतात. त्यांच्यामागे २३० खासदारांचे पाठबळ आहे. त्यामुळे समोरच्या बाकावारील सत्ताधाऱ्यांना  सामना करणे सोपे नाही. तातडीने काही विषय हातात घ्यावेत. निवडणूक आयुक्ताची नेमणूक करताना जी एक समिती असते त्यात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असतात. श्री. मोदी यांनी या समितीमधून त्या न्यायमूर्तींना काढून एका मंत्र्याची भरती केली. विरोधी पक्षाने हा विषय लावून धरावा.... सर्वोच्च न्यायालयाने उघड केलेला कर्जरोख्यांचा भाजपाचा भ्रष्टाचार हाही सभागृहात उपस्थित करावा. ‘कॅग’चा अहवाल मागच्या मोदी सरकारने दाबून ठेवला आहे... तोही उघड करावा. वाढलेले गॅस सिलिंडरचे दर... वाढती महागाई... कांदा आणि तत्सम वस्तुंवरील आयात-निर्यातीवरील बेबंद धोरण, दुष्काळ, अनेक भागांतील पाणीटंचाई.... यातील काही विषय राज्यसरकारचे असले तरी केंद्र सरकारला हस्तक्षेप करता येतो... महाराष्ट्रावर याबाबतीत गेल्या १० वर्षांत अनेकवेळा अन्याय झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या खासदारांनी एकत्रित आवाज उठवावा. जे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवलेले आहेत त्यावरही आवाज उठवावा. मराठी माणसांची कोंडी करण्याचा जाणूनबुजून प्रयत्न होत आहे. मुंबईचे महत्त्व कमी केले जात आहे. या सगळ्यांचा राग मतदारांना होता. म्हणून तर मुंबईच्या मतदारांनी भाजपाचे नाक तळापासून कापले. आता विधानसभेच्या निवडणुकीतही अाशिष शेलार यांनाच अध्यक्ष ठेवा. फडणवीस यांचे नाटक आता उघडे पडलेच आहे. 


‘उपमुख्यमंत्रीपद नको-नको’, असे नवे गाणे त्यांनी सुरू केले होते. गेल्या ५ वर्षांपूर्वीचे ‘मी पुन्हा येईन...’ हे गाणे बंद झाले आहे... आता ‘मी चाललो’, असे गाणे सुरू झाले.... पक्षाची जबाबदारी घेतो, असे म्हणतात... फडणवीस महाराष्ट्रात सत्तेत आणि भाजपामध्ये असेपर्यंत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी विरोधकांना फार काही करावे लागेल, असे नाही.  आजची भाजपाची जी अवस्था झाली तो सगळा पराक्रम फडणवीस यांचाच आहे. त्यामुळे फडणवीस हे महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचे एका अर्थाने मदतगार आहेत, असेच मानायला हवे. मोदींमध्ये देवाचा अंश आहे, असा साक्षात्कार मोदीसाहेबांना झाला होता. ‘फडणवीसांमध्ये हनुमानाचा अंश आहे’, असा साक्षात्कार बानवकुळे यांना झालेला आहे.... त्यामुळे हा हनुमान आता सरकारातही हवा आणि भाजपातही हवा... याच जागेवर मी दोन दिवसांपूर्वी लिहिले होते, ‘उपमुख्यमंत्रीपदातून मोकळे करा’ हे फडणवीसांचे नाटक होते. तेही आता उघड झाले आहे. 

काँग्रेस आणि लोकशाही आघाडीसाठी एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की, या आघाडीने आता लोकांचे प्रश्न घेवून रस्त्यावर उतरावे. लोकसभेत चांगले यश मिळाले यामुळे फार हुरळून जाऊ नये... लोकसभेच्या १६० विधानसभा मतदारसंघात लोकशाही महाआघाडीला मताधिक्य आहे. हे सत्य आहे. पण त्याचा अर्थ विधानसभा निवडणुकीत लोकशाही महाआघाडीला या १६० च्या १६० जागा मिळतील, असे नव्हे... कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असताना लोकसभा निवडणुकीत भाजपाने दुप्पट जागा मिळवल्या... एका निवडणुकीचे गणित दुसऱ्या निवडणुकीला लागू पडते, असे गृहित धरू नका...
लोकसभा निवडणुकीतील परिस्थिती वेगळी होती. चार महिन्यांनंतरच्या विधानसभा निवडणुकीची परिस्थिती वेगळी असेल... उमेदवार वेगळे असतील... स्थानिक विषय वेगळे असतील... त्यामुळे लोकसभेत यश मिळाले, तेवढेच यश विधानसभेत त्या मतदारसंघात तसेच्या तसे मिळेल, असे गणित मांडू नका... काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी काही समान सूत्र ठरवावी... निर्णय एकत्रित करावेत... ते निर्णय कोणी जाहीर करायचे तेही ठरवून घ्या... नाहीतर संजय राऊत परस्पर निर्णय जाहीर करून टाकतील... आणि सांगलीमध्ये उमेदवार उभा करून टाकतील... असे करून काय होते ते मतदारांनी दाखवून दिले. आघाडीचा निर्णय झाला नसताना, शिवसेनेने सांगलीत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. हे मतदारांना अजिबात आवडले नाही. विशाल पाटील त्यामुळेच उसळून उठला. आणि संजयकाका यांचा पराभव झाला. अर्थात संजयकाका यांनी खासदारकीच्या काळात सांगलीच्या एकाही प्रश्नाला हात घातला नव्हता, ही गोष्ट वेगळीच होती. संजयकाकाचा तो आवाकाही नाही. आता एक तरुण आणि वसंतदादांच्या घरातील मुलगा मतदारांनी निवडून दिला... दादांचे घराणे राजकीयदृष्ट्या जिवंत ठेवले.. यात आमदार विश्वजीत कदम यांची फोर मोठी भूमिका आणि कष्ट राहिले. त्यांचेही अभिनंदन केले पाहिजे. विशाल पाटील लगेच काँग्रेसचे सहसदस्य झाले. याबद्दलही अभिनंदन. 
शिवसेनेने... ‘आम्ही म्हणू तसे मतदार मान्य करतात...’ असे समजू नये... सांगलीने तो समज दूर केलेला आहे. आणि म्हणून संजय राऊत यांची, नेता म्हणून आणि पत्रकार म्हणून, वेगवेगळी भूमिका आहे. त्याची भेसळ काही प्रमाणात झाली. त्यामुळे किमान ४ जागांवर शिवसेनेला फटका बसलला आहे. त्यांच्याकडे चिंतन होते की नाही, हे माहिती नाही... औरंगाबादमध्ये खैरे यांची उमेदवारी एकदम चुकली. तो आज विषय नाही... पण शिवसेनेला अपेक्षित यश का मिळाले नाही, याचा त्यांनीच विचार करावा. आता पुन्हा एकदा थोडे दादांबद्दल.... 

पवारसाहेबांबासून दादा फुटले तेव्हा... तटकरे यांनी जोरात सांगितले होते की, ‘आमचे अस्तित्त्व वेगळे राहिल’ अजगराने एकदा का गिळले की, गिळलेल्या प्राण्याचे अस्तित्त्व वेगळे राहात नाही.  लोकसभेत शिंदे आणि दादागटाला स्वतंत्र अस्तित्त्व राहिलेले नाही. लोकसभेत ते भाजपाचे ‘विस्तारित पक्ष’ म्हणून  मानले आहेत. यात काय शोभा राहिली?  फुटलेल्या दादागटाला मंत्रिमंडळाच्या रचनेतील नावांमुळे याचा धडा मिळाला. अजूनही पुन्हा सांगतो, दादा गटाला भाजपावाले वापरून घेतील... भाजपाचा राग आहे तो, सुप्रिया सुळे यांना दादांनी पराभूत न केल्यामुळे... २०१४ साली चंद्रकांत पाटील हे कॅबिनेट मंत्री लोकसभा निवडणुकीत पूर्णवेळ बारामतीतच बसले होते. महादेव जानकर या धनगर समाजाच्या नेत्याला मुद्दाम उभे केले हाेते. तो प्रयोग फसला. २०१९ ला पुन्हा सगळी ताकद लावली. तरी भाजपाच्या नशिबी पराभव आला. मग दादांना फोडण्याचे ठरले. दादांनाही वाटले, आपण २०१९च्या विधानसभा निवडणुकीत पडळकरला २ लाख मतांधिक्याने आपटलेले आहे. तिकडे इंदापुरात दत्ता भरणे आहेत.  हर्षवर्धन पाटील भाजपामध्ये आहेत. पुरंदर, दौड आपल्याच हातात आहे. खडकवासल्यात, वारजे विभागात सगळे ‘भावे -आपटे - गोडबोले’ आहेत.  भोरमध्ये अनंतराव थोपटे यांचे मोठ्या साहेबांशी सख्य नव्हते... त्यामुळे भोरमध्येही आपण लीड घेवू, पण आमदार संग्राम थोपटेंनी दादांचे सगळे अंदाज उलटवले. आणि मोठे मताधिक्य दिले. अाणि खुद्द दादांच्या बारामतीतही दादांचा ‘पडळकर’ झाला. सर्व ठिकाणी मार पडला... पवारसाहेबांना आव्हान देतो आहोत, याचा विसर पडला... दादा गटाला केंद्रात मंत्रिपद दिले नाही. त्याच्यामागे ही सगळी मिमांसा आहे. पवारसाहेबांच्या विरोधात भाजपा नेते लढू शकत नाहीत म्हणून दादांना फोडले होते...  शिखंडी म्हणून दादांना पुढे केले. एवढ्या पराभवानंतर मंत्रिपद कसे देणार? आणि देवू काय केले, तर राज्यमंत्रीपद... हा तर सगळ्यात मोठा अपमान... आणि जाणूनबुजून केला... दादांना तो अपमान वाटेल की नाही, ते माहित नाही... पण तेही आता चक्रव्यूहात पूर्ण फसले आहेत. त्यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीत ‘कमळ’ घेवून उभे रहायलासुद्धा सांगतील... आणि आता ‘घडयाळ’ निशाणी जाईलसुद्धा... असो... 

दादा आणि त्यांच्या गटाचे जे काही व्हायचे ते पाहून घेतील. आता दादा या विषयावर लिहायचे नाही. निवडणूक पार पडली... नवे सरकार आले... आता तो विषय संपला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागायला हवे. दिल्लीचे सरकार बदलले नसले तरी त्यांची घमेंड कमी झाली आहे का, हे दिसेल... महाराष्ट्रातील सरकार बदलता येईल... आणि पुन्हा एकदा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र उभा करण्यासाठी पुरोगामी विचाराचे सरकार आणता येईल. तो प्रयत्न आघाडीने प्रामाणिकपणे करावा...  
सध्या एवढेच...

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.