लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये बहुमत हुकल्यानंतर भाजपाने मित्रपक्षांसह सरकार स्थापन करण्याची तयारी केली आहे. तसेच त्यासाठी आज भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएकडून सत्तास्थापनेचा दावाही करण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे इंडिया आघाडीकडून आपण सध्यातरी सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतील काही नेत्यांनी सरकार स्थापन करण्याची आशा सोडली असं चित्र दिसत असलं तरी पडद्यामागे खूप हालचाही होत आहेत.
तसेच काही जुळवाजुळव करून सरकार स्थापन करता येईल का, याबाबत चाचपणी केली जात आहे. सरकार स्थापन करण्याची शक्यता तपासण्यासाठी सुरुवातीला शरद पवार यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आता ममता बॅनर्जी यांनी मोर्चा सांभाळला आहे. तसेच काँग्रेसने नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी ममता बॅनर्जी यांच्यावर सोपवली आहे.
त्यामुळे ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी हे सातत्याने दिल्लीचे दौरे करत आहेत. तसेच अनेक नेत्यांच्या भेटीगाठीही घेत आहेत. अभिषेक बॅनर्जी यांनी आधी दिल्लीमध्ये आपचे नेते आणि नंतर सपाचे नेते अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. समोर येत असलेल्या बातम्यांनुसार ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापनण्यासाठी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी ही ही अखिलेख यादव यांच्याकडे सोपवली आहे.
दरम्यान, अधिकृतरीत्या इंडिया आघाडीने सध्या घडत असलेल्या घटनाक्रमांवर लक्ष ठेवून योग्य वेळेची वाट पाहत योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचे निश्चित केले आहे. मात्र तृणमूल काँग्रेस. शिवसेना ठाकरे गट आणि आप हे पक्ष भाजपाला धोबीपछाड देण्यासाठी इंडिया आघाडीतील पक्षांची संख्या वाढवण्यासाठीच्या पर्यायांची चाचपणी करत आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीच्या निकालांच्या दिवशीच समाजवादी पार्टीच्या अखिलेश यादव यांच्याशी चर्चा केली होती. तसेच ममता बॅनर्जी यांनी त्यांनी चंद्राबाबू नायडू आणि नीतीश कुमार यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले होते. नीतीश कुमार आणि अखिलेश यादव यांचे चांगले संबंध आहेत. तसेच चंद्राबाबू नायडू हे अखिलेश यादव यांचे वडील मुलायम सिंह यांचे ९० च्या दशकातील सहकारी राहिले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.