सांगली : सेक्स वर्कर्ससाठी शासनाने अनेक कायदे केले आहेत, सर्वोच्च न्यायालयानेही निर्देश दिले आहेत. पण त्यांची अंमलबजावणी व्हायला हवी. त्यासाठी कायद्याची मदत घ्यावी असा सूर सांगलीतील कार्यशाळेत व्यक्त झाला.
विधी सेवा प्राधिकरण व बार असोसिएशनतर्फे सेक्स वर्कर्सच्या हक्कांविषयी गुरुवारी कार्यशाळा झाली. पाहुण्यांना शिदोरी देऊन उदघाटन झाले. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा नंदिनी आवडे म्हणाल्या, या क्षेत्रातील महिलांना, त्यांच्या मुलांना जातीचे प्रमाणपत्र कसे देता येतील याचा विचार केला आहे. एकाच कुटुंबातील तीन पिढ्या या व्यवसायात आढळल्या, पण त्यांच्याकडे जातीचे प्रमाणपत्र नाही. पुरावे नसले तरी प्रमाणपत्र मिळते. त्यासाठी अधिकारी वस्तीत येऊन स्थानिक चौकशी करतात. १९५० पासून महाराष्ट्रात राहत असल्याचा पुरावा मात्र आवश्यक आहे.
सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर म्हणाले, जिल्ह्यात २१४ तृतीयपंथी व्यक्तींची आमच्याकडे नोंद आहे. त्यापैकी १३८ तृतीयपंथींना ओळखपत्रे दिली आहेत. सेक्स वर्करच्या मुलांना आईच्या नावे जातीचा दाखला कसा मिळेल? घरकुले कशी मिळतील? याविषयी शासनाकडून मार्गदर्शन अपेक्षित आहे. ॲड. फारूक कोतवाल म्हणाले, सेक्स वर्कर आणि तृतीयपंथी व्यक्तींनाही सर्वसामान्य व्यक्तीचे अधिकार आहेत. सगळेच पोलीस वाईट नसतात. त्यांनी आपण कोणाला तरी न्याय द्यायला बसलो आहोत हे लक्षात ठेवायला हवे. संग्राम संस्थेच्या मीना शेषू म्हणाल्या, सेक्स वर्करसाठी अनेक कायदे आहेत, पण त्यांच्या अंमलबजावणीचा प्रश्न आहे. लोकांची वागणूक कशी बदलायची? हादेखील प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनेक चांगले निर्णय दिले आहेत, त्यानुसार कार्यवाही व्हायला हवी.
ॲड. राजेंद्र माने म्हणाले, सामान्य लोकांनी हक्कांसाठी भांडायला हवे. त्यांच्या मदतीसाठीच विधी सेवा प्राधिकरण आहे. वकीलांवर शासन खर्च करते. त्याचा लाभ घ्यायला हवा. वेश्या व्यवसाय गुन्हा नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. पण अनेकदा निर्देशांचे उल्लंघन होते. पोलिस ठाण्यात बसूनच पंचनामे रंगवले जातात. जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार वीणा खरात, ॲड. शोभा पाटील, पत्रकार सुरेश गुदले, एड्स प्रतिबंध कक्षाचे दीपक चौगुले यांनीही मार्गदर्शन केले. पोलिस निरीक्षक संदीप वाघमारे, ॲड. जयवंत नवले, विवेक सावंत आदी उपस्थित होते. वेश्या अन्याय मुक्ती परिषद (व्हॅम्प), मुस्कान व नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्स यांनी आयोजन केले.
शासन देवासारखे
नंदिनी आवडे म्हणाल्या, शासन देवासारखे असते. देव दिसत नसला तरी भक्तांसाठी काहीतरी करीत असतो. तसेच शासनही अखंडपणे काहीतरी करीत असते. प्रत्यक्ष दिसत नसले, तरी त्याच्यावर विश्वास हवा.
पुरोगामी सांगलीत हॉटेलकडून दुजाभाव
पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या सांगलीसारख्या शहरात कार्यशाळेबाबत विजनगरमधील एका उच्चभ्रू हॉटेलने दुजाभावाची वर्तणूक केली. सेक्स वर्कर्सच्या कार्यशाळेसाठी सभागृह देण्यास सुरुवातीला होकार दिला. पैसे भरण्याची वेळ आल्यानंतर मात्र बुधवारी सायंकाळी ऐनवेळी नकार कळविला. टेरेसवरील बारमध्ये कार्यशाळा घेण्यास सुचविले. आजच्या कार्यशाळेत संयोजकांनी हा दुजाभाव वेदनादायी असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.