बॉलिवुडमधल्या अनेक सेलिब्रिटींशी थेट संपर्क, महागड्या भेटवस्तूंची रेलचेल, अभिनेत्रींशी अफेअरच्या चर्चा या सगळ्यांच्या केंद्रस्थानी असणारा ‘कॉनमॅन’ सुकेश सध्या चर्चेत आहे.
त्यानं केलेले अनेक ‘पराक्रम’ अजूनही एकेक करून बाहेर येताना ऐकायला मिळत आहेत. पण असाच एक मोठा बनाव करणाऱ्या साताऱ्यातील २९ वर्षीय ‘कॉनवुमन’ कश्मिरा पवारला बुधवारी सातारा पोलिसांनी अटक केली. तिच्यासह तिचा कथित प्रियकर आणि या सगळ्या घोटाळ्यातील सहआरोपी ३२ वर्षीय गणेश गायकवाड यालाही पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना सातारा न्यायालयाने पोलीस कोठडीत पाठवलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.
जवळपास सहा वर्षांपूर्वी साताऱ्यातल्या २४ वर्षीय तरुणीच्या ‘उत्तुंग भरारी’च्या बातम्या वृत्तवाहिन्यांवर झळकल्या होत्या. यात संबंधित तरुणीनं विविध महत्त्वाच्या उपक्रमांसाठी केंद्र सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेत मोठं यश मिळवल्याचं सांगण्यात आलं होतं. तसेच, या तरुणीची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नियुक्ती केल्याचाही दावा करण्यात आला होता. आपण कसं यश मिळवलं आणि केंद्र सरकारनं कशी आपल्याला ग्राम विकासासंदर्भातील प्रकल्पांसाठी थेट पीएमओची सल्लागार म्हणून नियुक्ती दिली, याचे दावे या तरुणीनंही तेव्हा मुलाखतींमध्ये केले. पण ६ वर्षांनंतर हा सगळाच बनाव असल्याचं उघड झालं. ही तरुणी म्हणजेच बुधवारी अटक करण्यात आलेली कश्मिरा पवार!
नेमकं काय घडलं?
आत्तापर्यंत पोलिसांकडे फसवणुकीच्या तीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातली एक तक्रार गेल्या वर्षी दाखल झाली आहे. या तीन तक्रारकर्त्यांना मिळून तब्बल ८२ लाखांचा चुना लावण्यात आल्याची माहिती सातारा पोलीस स्थानकाचे निरीक्षक आर. बी. मस्के यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे. या तक्रारीवरून सातारा पोलिसांनी फसवणुकीच्या कलमांखाली एफआयआर दाखल केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने कश्मिरानं बनवलेलं बनावट पत्र! (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)
याव्यतिरिक्त पुण्याच्या बंड गार्डन पोलिसांकडे मंगळवारी, अर्थात १७ जून रोजी गोरख मरळ नावाच्या ४९ वर्षीय व्यावसायिकानं कश्मिरा आणि गणेश यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. सरकारी टेंडर मिळवून देण्याच्या बदल्यात तब्बल ५० लाखांची फसवणूक केल्याचा आरोप या तक्रारीत मरळ यांनी केला आहे. व्हॉट्सअॅपवर या टेंडरची बनावट कागदपत्र पाठवून त्याबदल्यात आपल्याकडून ५० लाख रुपये घेतल्याची तक्रार मरळ यांनी केली. हा सगळा व्यवहार डिसेंबर २०१९ ते मार्च २०२२ या काळात काही रक्कम ऑनलाईन आणि काही रक्कम रोख स्वरूपात देऊन झाला, असंही तक्रारीत म्हटलंय.
कशी झाली फसवणूक?
मरळ यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कश्मिरा आणि गणेश यांनी सहा वर्षांपूर्वी बातम्यांमध्ये आलेल्या माहितीचा दाखला देत त्यांचा विश्वास संपादन केला. “त्यांनी २० नोव्हेंबर २०१९ रोजीचं एक पत्र मला पाठवलं. त्यावर थेट पंतप्रधान मोदींची सही होती. या पत्रात कश्मिराची थेट पंतप्रधानांची सल्लागार म्हणून नियुक्ती झाल्याचं लिहिलं होतं. शिवाय गणेशनंही त्याचे थेट रॉ मधील अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचं सांगितलं. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नावाने त्याला जारी करण्यात आलेला शस्त्र परवानाही त्यानं दाखवला”, असं मरळ म्हणाले. “घोटाळा लक्षात आल्यानंतर मी माझे पैसे परत मागितले, तर कश्मिरानं माझ्याच विरोधात खंडणीची तक्रार दाखल केली”, असंही मरळ यांनी सांगितलं.
हॉटेल मालकालाही फसवलं!
दरम्यान, दुसरीकडे एका हॉटेल चालकानंही कश्मिरा आणि गणेशविरोधात डिसेंबर २०२२ मध्ये सातारा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. “हे दोघे पंतप्रधान कार्यालयाकडून कश्मिराची नियुक्ती झाल्याची बनावट कागदपत्रं दाखवून महाराष्ट्रभरात लोकांची फसवणूक करत आहेत”, असं तक्रारदार भंबाळ यांनी तक्रारीत म्हटलं आहे. भंबाळ यांनी तक्रारीसोबत कश्मिरा आणि गणेशनं दिलेली बनावट कागदपत्रंही जोडली आहेत.
लोक दोघांच्या फसवणुकीला कसे फसले?
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कश्मिरा आणि गणेश एखाद्या व्हीव्हीआयपीप्रमाणेच या भागात वावरत होते. त्यामुळे कुणालाही त्यांच्यावर संशय आला नाही. शिवाय, वृत्तवाहिन्यांमध्ये कश्मिराच्या यशाबद्दल आलेल्या वृत्तामुळे त्यांच्या या बनावाला मोठीच मदत झाली. हे दोघे केंद्र सरकारच्या नावाने जारी करण्यात आलेले व्हीव्हीआयपी ओळखपत्र आणि बॅच लावून फिरत असत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.