अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे षङयंत्र नेमके कुणी रचले:- पृथ्वीराज पाटील
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे षङयंत्र नेमके कुणी रचले, याची चौकशा झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केली आहे. या प्रकरणात मराठा तरुणांवर सूड उगवण्याचे कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याशी आज पृथ्वीराज पाटील यांनी मोबाईलवरून संपर्क साधला. महामंडळात झालेल्या नोकर कपातीबद्दल तीव्र शब्दात संताप आणि नाराजी व्यक्त केली. नरेंद्र पाटील यांनी मराठा तरुणांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. शिवाय, या संवादनशील विषयात लक्ष घातल्याबद्दल पृथ्वीराजबाबा पाटील यांचे आभार मानले.पृथ्वीराज पाटील यांनी म्हटले आहे, की मराठा समाजातील मागास घटक संकटांनी पिचलेला आहे. मराठा आरक्षण प्रश्नात सरकार सातत्याने वेळकाढूपणा करत आहे. नोकऱ्या नाहीत, उद्योग करावा तर बँका कर्ज देत नाहीत, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून विकासात हातभाराची अपेक्षा आहे. सरकारने हे महामंडळ अधिक मजबूत करणे अपेक्षित आहे. असे असताना त्यात नोकर कपात करून महामंडळाला विकलांग करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तब्बल ६१ कर्मचाऱ्यांची कपात करणे धक्कादायक होते.
सांगली जिल्ह्यात पाचपैकी चार कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड कोसळली. एका कर्मचाऱ्यावर महामंडळ कार्यालय कसे काम करणार होते. या प्रकरणी व्यवस्थापकीय संचालकांकडे बोट दाखवले जात आहे. त्यांचा यामागचा हेतू काय होता, याची संपूर्ण चौकशी करणे गरजेचे आहे. व्यवस्थापकीय संचालक हे चेहरा आहेत आणि त्यामागे कुणाचा कुटील डाव आहे का, याची पडताळणी व्हायला हवा. मराठा समाजातील तरुणांवर कुणी राजकीय सूड उगवण्याचा प्रयत्न करते आहे का, याची शहानिशा झाली पाहिजे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.