पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागातील पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच आणखी एक अपघाताची घटना समोर आली आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांनीच एका वाहनाला मागून धडक दिल्याची घटना घडली आहे. मुख्याधिकारी एन के पाटील यांना पोलिसांनी घरी जाऊन ताब्यात घेतले आहे.
मुख्याधिकारी पाटील यांनी मद्यपान केले होते का? याची पडताळणी करण्यासाठी त्यांचे मेडिकल चेकअप केले जातं असल्याची माहिती मिळत आहे. ही घटना पिंपरी चिंचवड येथील तळेगाव दाभाडे शहरातील काका हलवाई दुकानासमोर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन.के. पाटील कार चालवत तळेगाव स्टेशन च्या दिशेने जात होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास काका हलवाई दुकानाजवळ आल्यानंतर त्यांनी रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या एका कारला धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की, धडक दिलेल्या वाहनाची त्यापुढच्या वाहनाला धडक बसली. यामध्ये दोन वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
अपघातानंतर मुख्याधिकारी यांनी स्वतःला घरात कोंडून घेतलं
या अपघातानंतर मुख्याधिकारी पाटील स्वतःच्या घरी निघून गेले आणि स्वतःला घरात आतून कोंडून घेतले. या अपघाताची माहिती मिळताच तळेगाव पोलीस काही वेळातच मुख्याधिकारी पाटील यांच्या घरी दाखल झाले. पोलिस पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतील, त्यामुळे पाटलांनी आतून दार उघडलंच नाही.मात्र, पोलीस जात नसल्याचं लक्षात आल्यावर शेवटी पाटलांनी दार उघडलं. मग, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. आता, पाटील यांची वैद्यकीय तपासणी केली जातं आहे. दरम्यान, पाटील यांनी मद्यपान करुन गाडी चालवली का याबाबतची माहिती वैद्यकीय तपासणीनंतरच समोर येईल. पुढील तपास पोलीस करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.