ओबीसी आंदोलक आमचे विरोधकच नाहीत. तो येवलावाला काड्या करत आहे. लक्ष्मण हाकेंना भुजबळांनीच उभे केले आहे. ओबीसी आंदोलनाला भुजबळच सगळे पुरवत आहेत. तुमचे राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केले तर नाव बदलेन, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांना आज डिस्चार्ज मिळाला होता. मात्र त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी डिस्चार्ज घेतला होता, बीडला जाऊन आलो. पण, तब्येत खराब झाली. त्यामुळे पुन्हा रुग्णालयात दाखल झालो. ओबीसींची चांगली मागणी आहे. त्यामुळे मराठा नेत्यांची डोळे उघडतील. ओबीसी नेते तुटून पडले आहेत. मराठ्यांच्या डोळ्यावर आलेली मस्ती आता उतरेल.
येवलावाल्याची नियत काय आहे हे समजले
भुजबळ अनेक दिवसांपासून मराठा नोंदी रद्द करा असे म्हणतात. मंडल आयोगाने दिलेल्या आरक्षणाव्यतिरिक्त दिलेले आरक्षण रद्द करा. मंडल आयोगाने दिलेले आरक्षण ही रद्द करा. त्याने टोळी तयार केली आहे. 16 टक्के आरक्षण तुम्ही कसे घेतलं, आता दाखवतो. येवलावाल्याची नियत काय आहे हे समजले. मराठा नेत्यांनी भाकरी खाणे बंद करावे. हक्काच्या नोंदी रद्द करा, असे ते म्हणतात. मराठे नेते आता तरी जागा व्हा. मराठा कुणबी असल्याचे नोंदी सापडल्या तरी ते म्हणतात रद्द करा, अशी टीका त्यांनी यावेळी भुजबळांवर केली.
हाकेंच्या मागणीवर ओबीसी नेते गप्प का?
ओबीसी लोकांचे वाटोळं मला करायचं नाही. मंडळ आयोग रद्द होते आणि चॅलेंज देखील होते. जातीयवाद कसा असतो ते ओबीसी नेत्यांकडून पाहायला मिळत आहे. मराठा समाजाबद्दल यांची नियत काय आहे ते दिसले. ओबीसी 70 वर्षांपासून बोगस आरक्षण खात आहेत. आज गरीब लोकांना मिळत आहे तर यांना वाईट वाटत आहे. त्यांचे विचार उघड पडले. लक्ष्मण हाके किती जातीयवादी आहे हे कळले. हाकेंच्या मागणीवर ओबीसी नेते गप्प का? असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केलाय. आता मराठा नेत्यांवर टीका करणे कमी करा, असे आवाहन यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केले.
फडणवीस साहेब आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवलाय
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही कोणावरही न्याय होऊ देणार नाही. योग्य तो मार्ग काढू, जातीजातीतला वाद आम्हाला नको आहे. यावर मनोज जरांगे म्हणाले की, फडणवीस साहेब आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. तुम्ही अन्याय होऊ देणार की नाही, हे आमच्या लक्षात आले आहे. तुम्ही ओबीसी नेत्यांच्या दबावाला पडून मराठ्यांवर अन्याय करणार आहात, असे त्यांनी म्हटले.
मी हाकेंना दोषच देत नाही, यामागे भुजबळच
ओबीसी आंदोलक आमचे विरोधकच नाहीत. तो येवलावाला काड्या करत आहे. हाकेंना भुजबळांनीच उभे केले आहे, असा आरोप यावेळी जरांगे पाटील यांनी केला आहे. तुमचे राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केले तर नाव बदलेन, असा इशारा त्यांनी छगन भुजबळ यांना नाव घेता दिला आहे. ओबीसी आंदोलनाला भुजबळ सगळे पुरवत आहेत. ओबीसी आंदोलन भुजबळांनीच उभे केले. मी हाकेंना दोषच देत नाही, यामागे भुजबळच आहेत. जातीयवाद मी नाही तर येवलावाल्याने सुरु केलाय, अशी सडकून टीका मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.