उन्हाळा संपत आल्यानंतर आणि पाऊस सुरू व्हायच्या आधीचा जो काही दिवसांचा काळ असतो, त्या काळात घरभर लाल मुंग्या खूप होतात. भिंतीवरून, ओट्यावर असणाऱ्या फटीतून, फरश्यांच्या गॅपमधून मुंग्यांची लांबच लांब रांग जाताना दिसते.
घरात अन्नाचा एखादा कण जरी सांडला तरी त्याभोवती लगेच लाल मुंग्या जमा होतात. या दिवसांत डायनिंग टेबलवर ठेवलेल्या अन्नाभोवतीही बऱ्याचदा मुंग्या झाल्याचं दिसून येतं . यातली एखादी मुंगी जरी चावली तरी होणारा त्रास विचारायलाच नको.. म्हणूनच या मुंग्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा.
घरातल्या मुंग्या कमी करण्यासाठी खास उपाय
घरातल्या मुंग्या कमी करण्यासाठी बाजारात अनेक खडू किंवा औषधी स्प्रे मिळतात. पण ज्यांच्या घरी लहान मुलं असतात, त्यांना तो स्प्रे किंवा खडू वापरण्याची भीती वाटते. कारण लहान मुलं खाली पडलेली कोणतीही वस्तू तोंडात घालतात. कुठेही हात लावतात. अशावेळी विषारी पदार्थांचा फवारा घरात करायला नको वाटते. म्हणूनच हा एक सोपा घरगुती उपाय पाहून घ्या. लहान मुलांसाठी किंवा घरातल्या कोणत्याही व्यक्तीसाठी तो मुळीच धोकादायक नाही. घरातल्या मुंग्या घालविण्यासाठीचा हा सोपा उपाय kamanabhaskaran या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त हिंग लागणार आहे.सगळ्यात आधी १ टेबलस्पून हिंग एका भांड्यामध्ये घ्या. त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाका. हे सगळं मिश्रण व्यवस्थित कालवून घ्या आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. आता घरात जिथे तुम्हाला मुंग्या दिसत आहेत, त्या भागावर हा स्प्रे शिंपडा. खिडक्यांच्या चौकटी, ओटा, दरवाज्यांच्या चौकटी, फरशांवरच्या भेगा अशा जिथून मुंग्या येतात त्या भागात हा स्प्रे शिंपडून घ्या. हिंगाच्या तिव्र वासामुळे मुंग्या त्या भागातून लगेचच निघून जातील. जोपर्यंत हिंगाचा वास त्या भागात राहील तोपर्यंत मुंग्या तिथे फिरकणारही नाहीत. करून बघा एकदा हा उपाय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.