कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीचा आदेश न आणल्यास मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांना कोल्हापूर बंद करायचे की काळे झेडे दाखवायचे यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी उद्या रविवारी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती व समन्वय समितीच्यावतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराणा प्रताप चौकात सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या बैठकीसाठी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, अॅड. बाबा इंदूलकर आणि बाबा पार्टे यांनी केले आहे.
सन १९४६ पासून कोल्हापूरची हद्दवाढ झालेली नाही. जानेवारी २०२१ मध्ये शिंदे हे नगरविकास मंत्री असताना कोल्हापूरला आले होते. त्यावेळी त्यांची भेट घेतली असता त्यांनी हद्दवाढीचा प्रस्ताव मागवून घेतला होता. परंतू याबाबत काहीही निर्णय झाला नाही. यानंतर समितीने अनेकवेळा तत्कालिन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली.
'विषय नवीन आहे. मी समजून घेतो. वेळ पडली तरी २० गावात फिरून मी त्यांची समजूत काढेन' असे आश्वासन केसरकर यांनी दिले होते. परंतू नंतर ते फिरकलेच नाहीत आणि नंतर त्यांचे पदही गेले. १५ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ध्वजवंदनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हद्दवाढीची गरज स्पष्ट केली होती.मात्र प्रस्ताव देवून चार वर्षे झाली, शिंदे नगरविकास खात्यापासून मुख्यमंत्री झाले तरीही एका इंचाने कोल्हापूरची हद्द वाढली नाही. त्यामुळेच त्यांच्या २७ जूनच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी त्यांना कोल्हापूर बंद करायचे की काळे झेंडे दाखवून निषेध करायचा यावर चर्चा करण्यासाठी या उद्याच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.