शिराळ्यातील 'त्या' खुनाचा सांगली पोलिसांकडून छडा; त्रास देत असल्याने मुलीच्या साथीने पत्नीनेच काढला काटा
शिराळा येथे प्रवासी बॅगेत सापडलेल्या मृतदेहाच्या खुनाचा छडा लावण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे. दारू पिऊन वारंवार शिवीगाळ करीत, संशय घेत असल्याच्या कारणावरून पत्नीनेच भाचा व मुलीच्या मदतीने हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
राजेश वसंतराव जाधव (वय 53, रा. पलूस) असे मृताचे नाव आहे. मृताचा भाचा देवराज ऊर्फ देव्या चंद्रकांत शेवाळे (रा. शेवाळेवाडी, ता. कराड), मुलगी साक्षी राजेश जाधव आणि मृताची पत्नी शोभा राजेश जाधव (दोघीही रा. पलूस) अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाची माहिती दिली.
20 मे रोजी शिराळा बायपास रस्त्यावरील साकव पुलाखाली आढळलेल्या एका प्रवासी बॅगमध्ये सतरंजीत गुंडाळलेला मृतदेह आढळला होता. नायलॉनच्या दोरीने गळा आणि शरीरास बांधून पुरावा नष्ट करण्यासाठी प्रवासी बॅगमध्ये मृतदेह ठेवून बॅग पुलाखाली फेकली होती. मृतदेह पूर्ण सडला होता. केवळ हाडांचा सांगाडा बाकी असल्याने तपास करण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. याबाबतची माहिती मिळताच अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक रितू खोखर यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या होत्या. पोलिसांनी तपासासाठी पाच पथके तयार केली होती. मृतदेहाच्या कवटीवरून पोलिसांनी रेखाचित्रही तयार केले होते. तसेच माहिती देणाऱयास पोलिसांनी 25 हजारांचे बक्षीसही जाहीर केले होते.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक मंगेश चव्हाण, शिराळ्याचे निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक हरिश्चंद्र गावडे, प्रवीण साळुंखे, युवराज सरनोबत, अनिता मेणकर, सिकंदर श्रीवर्धन, उपनिरीक्षक जयनाथ चव्हाण, गणेश खराडे, कुमार पाटील, महेश गायकवाड, कालिदास गावडे, नितीन यादव, संदीप पाटील, शरद जाधव, शरद बावडेकर, प्रशांत देसाई, अमर जाधव, शशिकांत शिंदे, शरद पाटील, राहुल पाटील, सुनील पाटील, नागराज मांगले यांच्या पथकाने कौशल्याने गुह्याची उकल केली.
तीन महिने मृतदेह बॅगेतच
मृत राजेश याचा भाचा देवराज, मुलगी साक्षी आणि पत्नी शोभा यांनी 21 फेब्रुवारी रोजी नायलॉनच्या दोरीने गळा आवळून राजेशचा खून केला होता. त्यानंतर दुसऱया दिवशी मृतदेह बॅगमध्ये भरून तो शिराळा येथे टाकला. मृतदेह टाकलेला भाग दुर्गम असल्याने कोणीही तिकडे फिरकले नाही. मृतदेह बॅगमध्ये सतरंजीत गुंडाळलेला असल्याने त्याची दुर्गंधीही लवकर पसरली नाही. त्यामुळे तीन महिने मृतदेह बॅगमध्ये पडून असल्याचे अधीक्षक घुगे यांनी सांगितले.
प्रवासी बॅग ठरली दुवा
मृतदेह पूर्णपणे सडून गेल्याने व कोणताही पुरावा नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान होते. यात केवळ प्रवासी बॅगचा दुवा महत्त्वाचा ठरला. पोलिसांनी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा येथील प्रवासी बॅगा बनविणाऱया कंपन्यांची माहिती घेतली. यात एका कंपनीने तयार केलेल्या बॅगा विक्रीसाठी पलूसमध्ये देण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पलूस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेत असताना पोलिसांना राजेश जाधव यांची माहिती मिळाली. पथकाने जाधव यांच्या नातेवाईकाकडे चौकशी केली असता, संशयितांनी खुनाची कबुली दिली. मृत राजेश जाधव यास दारूचे व्यसन होते व तो वारंवार पत्नी शोभा जाधव हिच्यावर संशय घेत होता. तसेच वारंवार मारहाण करीत असल्यानेच नायलॉनच्या दोरीने गळा आवळून त्याचा खून करून मृतदेह प्रवासी बॅगमधून शिराळा येथे टाकून दिल्याची कबुली संशयितांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.