भाजपला 800 ते 900 जागा देतील, संजय राऊत यांनी उडवली एग्झिट पोलची खिल्ली
लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर विविध संस्थांचे एग्झिटपोल शनिवारी संध्याकाळी जाहीर झाले. या एग्झिट पोलनुसार तिसऱ्यांदा मोदी सरकार येणार आहे. परंतु शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एग्झिट पोलची खिल्ली उडवली आहे.
चॅनलने मतदान केले नाही किंवा एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्याने मतदान केले नाही. एक्झिट पोलचे आकडे ठरवून दिलेले आहेत. राजस्थानमध्ये लोकसभेच्या 26 जागा आहेत परंतु एका एग्झिट पोलने भारतीय जनता पक्षाला 33 जागा मिळतील, असे दाखवले आहे. यामुळे एग्झिटपोल वाले भारतीय जनता पक्षाला 800 ते 900 जागा देतील, असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला. एग्झिट पोल अत्यंत फ्रॉड आहे, असे ते म्हणाले.
नरेंद्र मोदी यांच्या ध्यानवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारीत 45 तास ध्यान केले. परंतु ते ध्यानाला बसले असताना कॅमेरे लावले होते. त्यामुळे भाजपला 360-370 जागा मिळणार नाही. त्यांनी केलेल्या ध्यानामुळे किमान 800 जागा मिळाल्या पाहिजे तरच ते ध्यान मार्गी लागले असे म्हणता येईल. ओपनियन पोल आणि एक्झिट पोल गेल्या काही वर्षांत चुकीचे ठरत आहेत. भाजप देशाचे गृह मंत्रालय आणि यंत्रणा राबवून ते करुन घेत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
इंडिया आघाडीचे सरकार येणार
इंडिया आघाडीचे सरकार देशात येणार आहे. इंडिया आघाडीला 295 ते 310 जागा मिळतील, असा आम्हाला विश्वास आहे. लोकांकडून मिळालेला हा कौल आहे. सध्या मोठे मोठे जे पक्ष आहेत, जे सत्तेवरती आहेत, ते पैसे देतात आणि हवे तसे पोल घडवून आणत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. गेल्या दहा वर्षातील एग्झिट पोल म्हणजे ‘पैसा फेको, तमाशा देखो’ असा आहे. यामुळे आमचा त्यावर विश्वास नाही. आम्ही त्याच्यावर बोलणार नाही.
महाराष्ट्रात 35 जागा मिळणार
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 35 पेक्षा जास्त जागा मिळेतील. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे दीड लाख मतांनी विजयी होतील. शिवसेनेचा 18 चा आकडा कायम राहील तसेच काँग्रेसला बेस्ट परफॉर्मन्स होणार आहे. देशामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यात परिवर्तन घडणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.