राजस्थानच्या जयपूरमध्ये एका अमेरिकन महिलेची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. एका अमेरिकन महिलेला राजस्थानमधील दुकानाच्या मालकाने 300 रुपायंचे कृत्रिम दागिने तब्बल 6 कोटी रुपयांना विकत फसवलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चेरीश नावाच्या या अमेरिकन महिलेने जयपूर येथील जोहरी बाजारमधील दुकानातून सोन्याचे पॉलिश असलेले चांदीचे दागिने खरेदी केले होते.
चेरीशने दागिने खरेदी केल्यानंतर पुन्हा अमेरिकेला गेली होती. एप्रिल महिन्यात तिने एका प्रदर्शनात हे दागिने लावले होते. यावेळी ते खोटे असल्याचं लक्षात आल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. चेरीशने तात्काळ भारत गाठला आणि दुकानाचा मालक गौरव सोनी याला जाब विचारला.
दुकान मालकाने तिचे आरोप फेटाळून लावले. यानंतर महिलेने जयपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिने अमेरिकन दुतावासाकडेही मदत मागितली. त्यांनी पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती दिली आहे. महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये इंस्टाग्रामच्या माध्यमातून ती गौरव सोनीच्या संपर्कात आली होती. गेल्या 2 वर्षांत कृत्रिम दागिन्यांसाठी तिने 6 कोटी रुपये मोजले आहेत असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी गौरव सोनी आणि आणि त्याचे वडील राजेंद्र सोनी फरार असल्याची माहिती दिली. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं तयार करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.