Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अब्जाधीश भाऊबहीण! 48,900 कोटींची संपत्ती, तरीही ऑटो आणि सायकलने करतात प्रवास

अब्जाधीश भाऊबहीण! 48,900 कोटींची संपत्ती, तरीही ऑटो आणि सायकलने करतात प्रवास 


मुंबई : देशात काही पिढीजात श्रीमंत उद्योगपती आहेत. त्यांच्या अनेक पिढ्या कुटुंबाचं नाव आणि प्रतिष्ठा सार्थ ठरवत आल्या आहेत. याउलट काहींनी मात्र स्वतःच्या मेहनतीच्या बळावर पैसा, प्रतिष्ठा आणि यश मिळवलं आहे.

आपल्या हुशारी आणि मेहनतीच्या बळावर मोठे झालेल्या एका बहीण भावाची गोष्ट आज तुम्हाला सांगणार आहोत. श्रीधर वेम्बू आणि राधा वेम्बू अशी या भावंडांची नावं आहेत. ही दोघंही दक्षिण भारतातील आहेत. आयआयटी मद्रासमधून शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी व्यवसाय सुरु केला. शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय अशा सगळ्या स्तरावर त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली.

'जोहो' कंपनीचे संस्थापक असलेल्या श्रीधर वेम्बू यांनी सर्वसामान्य कर्मचाऱ्याप्रमाणे आपलं करिअर सुरु केलं. आज ते 48,900 कोटी रुपयांच्या फर्मचे सर्वेसर्वा आहेत. त्यांची बहीण राधा वेम्बू हिची गोष्टही प्रेरणादायी आहे. ती भारतातील श्रीमंतांच्या यादीत 40 व्या क्रमांकावर आहे. श्रीधर आणि राधा ही भावंडं तमिळनाडूतील एका मध्यमवर्गीय घरात लहानाची मोठी झाली. आयआयटी मद्रासमधून 1989 मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर श्रीधर पीएचडी करण्यासाठी अमेरिकेला गेले. 
काही वर्षांनी ते भारतात परतले आणि 1996 मध्ये त्यांनी 'जोहो' कंपनीची स्थापना केली. त्यांची बहीण राधा हिने देखील आयआयटी मद्रासमध्ये इंडस्ट्रियल मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केलं आणि 1997 या वर्षी ती 'जोहो'मध्ये दाखल झाली. 'ईटी' च्या रिपोर्टनुसार या कंपनीचं मार्केट कॅपिटलायजेशन 48,900 कोटी रुपये आहे. 31 मार्च 2023 ला संपलेल्या आर्थिक वर्षात 'जोहो' च्या विक्रीने 1 बिलियन डॉलरचा टप्पा ओलांडला. कंपनीचं ऑपरेटिंग प्रॉफिट 8,703.6 कोटी रुपये एवढं आहे.

अब्जाधीश असूनही या दोन्ही भावंडांचे पाय अद्याप जमिनीवर आहेत. श्रीधर यांना सायकल चालवणं आवडतं. राधा नेहमी साड्या नेसते. अलीकडेच श्रीधर यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आणि इलेक्ट्रिक ऑटो घेतल्याचं सांगितलं. सहसा अब्जाधीश उद्योगपती महागड्या कार, क्रूज बोट्स किंवा चार्टर्ड विमान घेतात त्यामुळे श्रीधर यांनी एक साधी इलेक्ट्रिक ऑटो घेतली आणि ते सोशल मीडियावर सांगितलं हे लोकांना खरंच वाटत नाही. श्रीधर यांना ग्रामीण भागाबद्दल विशेष प्रेम आहे. त्यामुळेच त्यांनी आपला व्यवसाय सुरु केला आणि तमिळनाडूतील तेनकासी जिल्ह्यात कंपनीचं ऑफिस सुरु केलं. ग्रामीण भागातील प्रतिभावंतांनी आपल्या कंपनीत काम करावं या उद्देशाने त्यांनी हे पाऊल उचललं.
फोर्ब्सच्या माहितीनुसार श्रीधर वेम्बू यांची नेट वर्थ 3.75 बिलियन डॉलर (31,000 कोटी रुपये) एवढी असून भारतीय श्रीमंतांच्या यादीत त्यांचा क्रमांक 55 वा आहे. 360 वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 नुसार राधा वेम्बू या सगळ्यात श्रीमंत सेल्फ मेड इंडियन वुमन आहेत. फोर्ब्सच्या माहितीनुसार राधा यांची नेटवर्थ 3.3 बिलियन डॉलर म्हणजे सुमारे 27,000 कोटी रुपये एवढी आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.