Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्हा बँकेचे 30 हजार शेतकरी होणार कर्ज मुक्त, 743 कोटींच्या वसुलीसाठी OTS योजना

जिल्हा बँकेचे 30 हजार शेतकरी होणार कर्ज मुक्त, 743 कोटींच्या वसुलीसाठी OTS योजना 


सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या थकीत पीककर्जाच्या वसुलीसाठी एकरकमी कर्जवसुली योजना (ओटीएस) सुरू केली आहे. जूनअखेरची पीककर्जाची सुमारे ७४३ कोटी थकबाकी आहे. जिल्ह्यात सुमारे ३० हजार थकबाकीदार शेतकरी असून, त्यांना ३० जूनअखेर ओटीएस योजनेचा लाभ घेता येणार आहे. यानिमित्ताने वर्षानुवर्षे थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
जिल्हा बँकेचा एनपीए १४ टक्क्यांवर गेला होता. मात्र गेल्या दोन वर्षात बँकेने थकबाकी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवत बिगरशेतीसह शेती कर्जाला एकरकमी कर्ज परतफेड (ओटीएस) योजना सुरू केली. बँकेचा एनपीए कमी करण्यासाठी अध्यक्ष व आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार चालू आर्थिक वर्षात बँकेचा एनपीए ५ टक्क्याच्या आत आणण्याचा निर्धार केला आहे.


शेती कर्जाच्या वसुलीवर शिवाजीराव वाघ यांनी मागील वर्षभरापासून विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शेतकऱ्यांनी ओटीएस योजनेचा लाभ घेत थकबाकी भरावी. यासाठी वाघ यांनी जिल्हा बँकेतील अधिकाऱ्यांना तालुक्यात पाठवून शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यास भाग पाडले होते. शेती कर्जाची सर्वाधिक थकबाकी जत तालुक्यातील वसुलीसाठी जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामाला लावले. गतवर्षी याचे चांगले परिणाम दिसून आले होते. त्यामुळे पुन्हा ओटीएस योजना लागू केली.

पीककर्जाच्या वसुलीसाठी बँकेने तालुकानिहाय आणि शाखानिहाय कर्मचाऱ्यांना वसुलीचे टार्गेट दिले होते. यामध्ये सर्वाधिक वसुली कडेगाव तालुक्यातून ९९.९० टक्के झाली आहे. त्याखालोखाल वाळव्यातून ८६.८६ टक्के झाली आहे. सर्वात कमी जत तालुक्यातून ४७ टक्के झाली आहे. वसुलीमध्ये पलूस ७३ टक्के, शिराळा ७८, आटपाडी ७७, खानापूर ७४, तासगाव ५९, कवठेमहांकाळ ५८.७६ आणि मिरज ६६ टक्के वसुली झाली आहे. उर्वरित वसुलीला ओटीएसचा आधार मिळण्याच्या आशा आहेत. पीक कर्जाच्या ओटीएस योजनेमुळे जिल्ह्यातील थकबाकीदार सुमारे ३० हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्त होण्याची संधी मिळणार आहे.
शेतकऱ्यांना व्याजमाफी मिळणार : मानसिंगराव नाईक

जिल्हा बँकेने यापूर्वी शेतकऱ्यांना दिलेल्या ओटीएस योजनेमुळे थकबाकी वसुलीत वाढ झाली आहे. त्या धर्तीवर पुन्हा थकीत कर्जाच्या वसुलीसाठी ओटीएस योजना सुरू केली आहे. ओटीएस अंतर्गत व्याज माफी शेतकऱ्यांना देण्यात येईल. या व्याज माफीची तरतूद बँकेच्या नफ्यातून करणार आहे. मार्च २५ अखेर बॅँकेचा एनपीए ५ टक्क्याच्या आत आणण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली.

बँकेकडून १५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती
जिल्हा बँकेने वाटप केलेल्या पीककर्जापैकी जुनी आणि चालू मिळून सुमारे दोन हजार २३७ कोटी थकबाकी होती. पैकी एक हजार ४९४ कोटी मार्चअखेर वसुली केली. जूनअखेर ७४३ कोटी वसुली शिल्लक आहे. या वसुलीसाठी बँकेने १५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. थकबाकी न भरणाऱ्यांवर बँकेकडून कारवाई होणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.