सांगली : महिलेच्या नावावर असलेल्या दोन विमा पॉलिसी मोडून परस्पर ४ लाख ९७ हजार रूपयेे हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रुती राहुल माने (वय ३९, रा. लोकल बोर्ड कॉलनी, टाटा पेट्रोलपंपाच्या मागे, विश्रामबाग) यांनी पती राहुल अशोक माने (वय ४३), रोहित अशोक माने (वय ३३, रा. सुमेदा प्रसाद अपार्टमेंट, गावभाग), विमा प्रतिनिधी शेखर स्वामी, शोभना शेखर स्वामी (रा. सेंट्रल स्कूलमागे, वारणाली) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, श्रुती माने या पती राहुल माने याच्यापासून विभक्त राहतात. श्रुती यांनी दोन विमा पॉलिसी उतरवल्या होत्या. त्या पॉलिसीचे पैसे त्या स्वत: भरत होत्या. पतीपासून विभक्त झाल्यानंतर त्यांनी पॉलिसीची खात्री करण्यासाठी २५ सप्टेंबर २०२३ रोजी विमा कार्यालय गाठले. तेथे चौकशी केल्यानंतर त्यांना दोन्ही पॉलिसी मुदतीपूर्वी मोडण्यात आल्याचे समजले. दोन्ही पॉलिसींचे ४ लाख ९७ हजार रूपये परस्पर काढून घेतल्याचे समजले.अधिक चौकशी केल्यानंतर पती राहुल माने, दीर रोहित, विमा प्रतिनिधी शेखर स्वामी, शोभना स्वामी यांनी संगनमत करून श्रुती यांच्या खोट्या सह्या घेऊन दोन्ही पॉलिसी मुदतीपूर्वी बंद केल्याचे दिसून आले. फेब्रुवारी २०२१ ते २५ सप्टेंबर २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. सदरची रक्कम परस्पर वापरून फसवणूक केल्याचे समजताच त्यांनी पती, दीर आणि विमा प्रतिनिधींकडे विचारणा केली. परंतू त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे श्रुती यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती, दीर आणि विमा प्रतिनिधी असलेल्या दांपत्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.