पहाटे घरातून फरार झाल्या 2 बहिणी; 2 दिवसांनी समजलं असं सत्य की घरचे हादरले
लखनऊ : शुक्रवारी सकाळी एका घरातून दोन सख्ख्या बहिणी अचानक बेपत्ता झाल्या. आता या दोघींचे मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वडील ओरडल्यामुळे दोन्ही बहिणींनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. ही घटना उत्तर प्रदेशच्या चित्रकूट येथील आहे.
हे प्रकरण राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नादिन कुर्मियांन गावाशी संबंधित आहे. जिथे ज्ञान सिंह नावाच्या व्यक्तीची 22 वर्षीय मुलगी सोमवती आणि 18 वर्षीय अनामिका उर्फ खुशबू शुक्रवारी पहाटे घरातून अचानक बेपत्ता झाल्या. घरच्यांनी दिवसभर त्यांचा शोध घेतला. मात्र त्या कुठेच सापडल्या नाहीत. त्यानंतर आज दोन्ही बहिणींचे मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत तरंगताना आढळून आले. त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
काही कारणावरून कुटुंबीय दोन्ही बहिणींना ओरडले असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे दोघीही रागावल्या आणि घरातून गायब झाल्या. दिवसभर शोध घेऊनही दोघी बहिणी न सापडल्याने सायंकाळी कुटुंबीयांनी पोलीस ठाणं गाठून पोलिसांना माहिती दिली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा मोठा भाऊ दीपक सिंह शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास त्याच गावातील अजय सिंह यांच्या घरी रामायण कार्यक्रमात सहभागी होऊन घरी परतला होता. त्यावेळी दोन्ही बहिणी घरी उपस्थित होत्या आणि त्या जाग्या होत्या. त्यांना दीपकने झोपायला सांगितलं. यानंतर दीपक स्वतः त्याच्या खोलीत जाऊन झोपला.
रविवारी सकाळी दहाच्या सुमारास घरापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या विहिरीत दोघींचे मृतदेह तरंगताना पाहून ग्रामस्थांनी कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीयांकडून माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही बहिणींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. मृतदेह पाहून कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच एएसपी चक्रपाणी त्रिपाठी, सीओ राजापूर निष्ठा उपाध्याय यांनी फील्ड युनिट टीमसह घटनास्थळी पोहोचून प्रकरणाची माहिती घेतली. सीओचे म्हणणे आहे की, दोन्ही बहिणींनी कुटुंबीय ओरडल्यामुळे आत्महत्या केल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळत आहे. तरीही या प्रकरणाची अनेक बाजूंनी बारकाईने चौकशी केली जात आहे. दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.