कोल्हापुरातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून करण्यात आला आहे. मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता असे सदर मृत आरोपीचे नाव असून तो कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता. दोन गटातील मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे बोललं जात आहे. या एकूण प्रकारामुळे कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मोहम्मद अली खान आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कारागृहातील हौदावर अंघोळ करण्यासाठी गेला होता. त्याठिकाणी आरोप प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत, संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार , सौरभ विकास सिद्ध या पाचजणांसोबत त्याचा वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हे हाणामारीत झालं. सदर ५ आरोपींची ड्रेनेज वरील लोखंडी झाकणाने मुन्नाला मारहाण केली होती. या मारहाणीत मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान याचा जागीच मृत्यू झाला. कारागृहातच कैद्याचा खून झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.या एकूण संपूर्ण प्रकारानंतर जुना राजवाडा पोलिस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अशा घटना कारागृहात घडत आहेत. कारागृहात वर्चस्व राहावं त्यामुळं वारंवार अशाप्रकारच्या हाणामारी होत असतात. मात्र, त्याकडे कारागृहाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी सुमारे दीड महिन्यापूर्वी कळंबा कारागृहात कैदी मोबाईल वापरत असल्याची टीप तुरुंग अधिकाऱ्यांना दिल्यानं गुंडाला १४ जणांनी मारहाण केली होती. यावेळी तुरुंगातील सुभेदार उमेश शामू चव्हाण जखमी झाले होते. आता तर थेट तुरुंगात 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.