Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लोकसभा पराभवानंतर भाजपचा मोठा ऍक्शन प्लॅन, 16 नेत्यांची फौज तयार, संघही दक्ष

लोकसभा पराभवानंतर भाजपचा मोठा ऍक्शन प्लॅन, 16 नेत्यांची फौज तयार, संघही दक्ष 


भाजपला महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. भाजपचे महाराष्ट्रात 2019मध्ये 22 खासदार होते. या निवडणुकीत ही संख्या 9वर गेली आहे. 13 जागांवर पराभूत होणं हा भाजपसाठी मोठा सेटबॅक असल्याचं सांगितलं जात आहे.


या पराभवानंतर भाजपने अंग झटकून कामाला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे उट्टे विधानसभा निवडणुकीत भरून काढण्यासाठी भाजपने ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार ज्या मतदारसंघात भाजपचा पराभव झाला, त्या मतदारसंघाची समीक्षा करण्यात येणार आहे. त्यासाठी बड्या नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण 16 नेत्यांची फौजच भाजपने तयार केली आहे.
लोकसभेतील पराभवानंतर भाजपने ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार राज्यातील पराभूत मतदारसंघातील कारणांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यासाठी प्रमुख नेत्यांवर मतदारसंघात जाऊन पराभवाची कारणे शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आपलं होमग्राऊंड राखू न शकलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांवर नांदेडच्या विश्लेषणाची जबाबदारी देण्यात आली आहे. महायुतीने गमावलेल्या 33 मतदारसंघांचाही आढावा घेतला जाणार आहे.

जिंकलेल्या जागांचा आढावा

भाजप केवळ पराभूत मतदारसंघाचाच आढावा घेणार नाहीये. तर जिंकलेल्या जागांवरही भाजपने निरीक्षक पाठवून आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच येत्या 22 जूनपर्यंत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे याबाबतचा अहवाल द्यावा लागणार आहे. बीडची जबाबदारी संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे, तर बारामतीची मंगलप्रभात लोढा आणि श्रीकांत भारतीय यांच्याकडे चंद्रपूरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

या नेत्यांवर जबाबदारी
जालना – चंद्रकांत पाटील

रामटेक – खा. अनिल बोंडे

अमरावती – आशिष देशमुख

वर्धा – आ. प्रवीण दटके

भंडारा-गोंदिया – रणजीत पाटील

यवतमाळ-वाशिम – आ. आकाश फुंडकर

दिंडोरी – विजयाताई रहाटकर

हिंगोली- आ. संजय कुटे

उत्तर-पश्चिम मुंबई – सुनील कर्जतकर

दक्षिण मुंबई – माधवी नाईक

उत्तर-मध्य मुंबई – हर्षवर्धन पाटील

उत्तर-पूर्व मुंबई – आ. राणा जगजितसिंह

मावळ – आ. प्रवीण दरेकर

अहमदनगर- खा. मेधा कुलकर्णी

माढा – आ. अमित साटम

भिवंडी – गोपाळ शेट्टी
बावनकुळेही दौरा करणार

दरम्यान आजपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विदर्भ दौऱ्यावर आहेत. बावनकुळे रामटेक, उमरेड, हिंगणा विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. यावेळी ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.

संघही दक्ष

भाजपप्रमाणेच आता संघही दक्ष झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांताची आज पुण्यात बैठक होत आहे. दुपारी पुणे शहरातील संघ मुख्यालय मोतीबाग येथे ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर चर्चा होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संघाकडून आमदारांची कार्यशाळाही घेतली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने संघाकडून आमदारांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. महत्त्वाच्या आमदारांना प्रशिक्षित करुन विधानसभेचा आढावा घेतला जाणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.