मुंबई: लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर भाजपानं विधानसभेसाठी कंबर कसली आहे. दिल्लीत झालेल्या भाजपा नेत्यांच्या बैठकीनंतर राज्यातील विधानसभेसाठी रणनीती आखणं सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहे. त्यातून येत्या विधानसभेला भाजपा १५५ जागांवर लढण्याची तयारी करत असल्याचं समोर आलं आहे.
महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेनं १०० तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ८० ते ९० जागांची मागणी केली असताना भाजपाकडून १५५ जागा लढण्याची तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे जागावाटपावरून महायुतीत तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपाच्या बैठकीत पक्षाने १५५ जागा तर शिवसेनेसाठी ६०-६५ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी ५०-५५ जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून मिशन ४५ प्लस यानुसार काम करण्यात आले. परंतु प्रत्यक्षात महायुतीनं फक्त १७ जागांवर विजय मिळवला. ४८ पैकी ३० जागांवर महाविकास आघाडीने महायुतीला पराभूत केले तर सांगलीच्या एका जागेवर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय झाला. विशाल पाटील हे काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने महाविकास आघाडी ३१ जागांवर निवडून आलीय. तर लोकसभेत भाजपाला अवघ्या ९ जागा, शिवसेनेला ७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं १ जागा जिंकली आहे.
ही चुकीची माहिती - शिवसेना
कोणत्या पक्षाच्या कोअर कमिटीत घेतलेला निर्णय म्हणजे महायुतीचा निर्णय समजायचं काही कारण नाही. जागावाटपाबाबत अशी कोणतीही बोलणी नाहीत, कुठलाही फॉर्म्युला ठरला नाही. विधानसभा अधिवेशनाच्या काळात किंवा त्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची एकत्रित बैठक होईल. त्या बैठकीत यावर चर्चा होईल. कोणता मतदारसंघ कुणाला सोडायचा, जागावाटप कसं होईल यावर सविस्तर चर्चा होईल. हा एका बैठकीतला विषय नाही. चर्चेच्या २-४ फेऱ्या होतील. त्यात ३ प्रमुख नेते एका निर्णयावर येतील आणि फॉर्म्युला ठरेल तेव्हाच जागावाटप जाहीर केले जाईल असं म्हणत शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी जागावाटपाबाबत समोर आलेली माहिती चुकीची आहे असं म्हटलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.