मुंबई : उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या नावाप्रमाणे आणखी चार संजय पाटील नावाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने खळबळ उडाली आहे. यातील तिघे सांगलीचे, तर एकजण मानखुर्द येथील रहिवासी असल्याचे उघड झाले आहे. या चौघांनीही एकाच व्हेंडरकडून एकाच दिवशी स्टॅम्प पेपर खरेदी केले असून, आता चारही जण 'नॉट रिचेबल' आहेत.
पाचवी, नववी आणि बी.ए. पास असलेल्या या उमेदवारांच्या बँक खात्यात कुठे ११ रुपये, तर कुठे पाच ते १० हजार असताना सर्वांच्या हाती एक ते सव्वा लाखाची रोकड असल्याचे प्रतिज्ञापत्रावरून निदर्शनास आले. यापैकी संजय निवृत्ती पाटील (सध्या रा. नवी मुंबई), संजय महादेव पाटील आणि संजय पांडुरंग पाटील हे सांगलीतील शिराळा विधानसभा मतदारसंघ तर, संजय बंडू पाटील हे मानखुर्द, शिवाजीनगर येथील रहिवासी असून, मूळचे साताराचे रहिवासी आहेत. यापैकी संजय महादेव पाटील हे कॉल कट करीत असून, अन्य तिघांचे फोन बंद लागत आहेत.संजय पाटील नावाचे उमेदवार एकाच व्हेंडरकडून स्टॅम्प पेपर खरेदी करतात. त्यानंतर, ते 'नॉट रिचेबल' होतात. ई-मेल आयडी देखील बनावट वाटत आहे. हा खोटेपणा जास्त दिवस चालणार नाही. असे कितीही डमी उमेदवार उभे केले तरी, आमचा मतदार हुशार असून मीच उत्तर पूर्वचा खासदार होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
संजय दिना पाटील, महाविकास आघाडी उमेदवार या चौकडीमागे नेमके कोण आहे, याचा शोध सुरू आहे. या चौघांनीही नवी मुंबईतील नीलेश भोजने यांच्याकडून २९ एप्रिलला स्टॅम्प पेपर खरेदी केल्याचे निदर्शनास आले आहे.
दोन संजय पाटील बाद
संजय पाटील नावाच्या चार उमेदवारांपैकी संजय बंडू पाटील (नॅशनल पीपल्स पार्टी) आणि संजय निवृत्ती पाटील (अपक्ष) यांचे अर्ज मंजूर झाले असून अन्य दोघांचे अर्ज बाद झाले. उत्तर पूर्व मुंबईत एकूण २० जणाचे अर्ज मंजूर झाले असून उर्वरित २२ अर्ज बाद झाले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.