हैदराबाद:- आंध्र प्रदेशात शनिवारी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. शुक्रवारीही एनटीआर जिल्ह्यात ८ कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आता राज्यातील गोदावरी जिल्ह्यातील प्रकार समोर आला आहे. याठिकाणी ७ बॉक्समध्ये ७ कोटी रुपये लपवून घेऊन जात होते. नल्लाजर्ला मंडलच्या अनंतपल्ली येथे एका ट्रकनं धडक दिल्याने छोटा हत्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या टाटा ऐस वाहन पलटी झालं आणि त्यातून हा प्रकार उघडकीस आला.
स्थानिकांनुसार, या वाहनात पोती भरली होती. त्यात ७ बॉक्स लपवण्यात आले होते. या घटनेची माहिती पोलिसांनी दिली तेव्हा ते घटनास्थळी पोहचले. या वाहनातून पोलिसांनी तब्बल ७ कोटी रुपये जप्त केले. ही घटना वाहन विजयवाडा ते विशाखापट्टनमच्या दिशेने जात होते तेव्हा घडली. या अपघातात टाटा ऐसच्या वाहनचालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला गोपालपुरमच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
याआधीही शुक्रवारी आंध्र प्रदेशच्या एनटीआर जिल्ह्यात पोलिसांना मोठं यश आले. इथं चेकिंगवेळी तब्बल ८ कोटी रोकड जप्त करण्यात आली. पोलिसांनी ट्रक आणि पैसे जप्त करत त्यातील चालकासह २ जणांना ताब्यात घेतले. रोकड असलेला हा ट्रक गरिकापाडू चेक पोस्टवर तपासणीवेळी आढळला. ही रक्कम हैदराबादहून गुंटूरला घेऊन जात होते. पोलिसांनी ही रक्कम तपास यंत्रणांकडे सोपवली आणि या प्रकरणाची निवडणूक आयोग चौकशी करत आहे. आंध्र प्रदेशात चौथ्या टप्प्यात सर्व २५ जागांवर मतदान आंध्र प्रदेश येथे सर्व २५ जागांवर एकाच टप्प्यात मतदान होत आहे. इथं चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान पार पडेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.