वकिलाने मुलाच्या मदतीने पक्षकार मित्रालाच संपवलं; मारेकरी पिता-पुत्राला अटक
नागपूर : एका वकिलाने त्याच्या मुलाच्या मदतीने पक्षकार मित्राची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे. नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडलीय. हरीष दिवाकर कराडे (वय 60 वर्ष) असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. तर अश्विन वासनिक आणि आविष्कार वासनिक असे संशयित आरोपीचे नाव आहे. जरीपटका पोलिसांनी संशयित आरोपी बाप आणि मुलाला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत. मात्र, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वकिलाने मुलाच्या मदतीने पक्षकार मित्रालाच संपवलं
या प्रकरणातील मृतक हरीष दिवाकर कराडे हे वायुसेनेत नोकरीवर होते. काही वर्षांपूर्वी त्यांना एका प्रकरणात नोकरीतून निलंबित करण्यात आले होते. त्यावेळी हरीष दिवाकर कराडे यांची न्यायालयात बाजू वकील अश्विन वासनिक यांनी मांडली होती. त्यामुळे हरीष कराडे यांना त्यांची नोकरी देखील परत मिळाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये कौटुंबीक मैत्रीचे संबंध निर्माण झालेले होते. हरिष कराडे आणि वकील अश्विन वासनिक हे दोघे रात्री उशिरापर्यंत दारू पित बसायचे. काल देखील दोघांनी दारू पार्टी आयोजित केली. मात्र, पैशाच्या घेवाण-देवाणवरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
त्यानंतर या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर संशयित आरोपी अश्विन वासनिकने मुलगा आविष्कार यांच्या मदतीने हरिष कराडेच्या मानेवर जोरदार कुऱ्हाडीने वार केले. या मध्ये करून हरीष कराडे यांचा मृत्यू झाला. हे प्रकरण उजेडात येताच पोलिसांनी प्रकरणाचा तपास करत मारेकरी पिता-पुत्राला अटक केल्याची माहिती जरीपटका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी दिलीय.
अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हॉटेल चालकाची हत्या
खामगाव आणि शेगाव परिसरात वाढलेल्या अवैध धंद्यांचा परिणाम काल रात्री पुन्हा एकदा खामगावकरांना अनुभवायला मिळाला आहे. खामगाव बस स्थानक समोर अतिशय वर्दळीच्या ठिकाणी चार इसमानी हॉटेल व्यवसायिक असलेले प्रकाश सोनी यांची चाकूने भोसकून हत्या केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, सोनी यांनी परिसरात एक अवैध जुगार चालणाऱ्या क्लबमध्ये मोठी रक्कम जिंकली होती. त्यातूनच हा वाद उद्भवला आणि प्रकाश सोनी यांची नागरिकांच्या समोर चौघांनी चाकूने भोसकून हत्या केल्याचा थरार खामगाव बस स्थानकासमोर रात्री घडला. या हत्येचा थरारक व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे.
आर्थिक देवाण घेवाणवरून हत्येचा थरार
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ यातील तिघांना अटक केली असून मारेकरी एक जण अद्याप फरार आहे. मात्र खामगाव आणि शेगाव परिसरात सुरू असलेले क्लब आणि अवैध व्यवसायामुळे पुन्हा एकदा नागरिकांना हत्येचा थरार बघायला मिळाला आहे. या हत्येत शेगाव येथील चार आरोपी सामील असून त्यापैकी मुख्य आरोपी हा केंद्रीय राखीव पोलीस दलातील निवृत्त शिपाई आहे. ही हत्या आर्थिक देवाण घेवाणवरून झाली असल्याचं पोलिसांचं म्हणणे आहे. यात पोलीस अधिक माहिती देण्यास तयार नाहीत, मात्र याचा तपास खामगाव शहर पोलीस करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.