भाजपच्या बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा प्रचार करताना उदयनराजे भोसले चांगलेच भावूक झाले होते. गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढताना उदयनराजे यांना भरसभेत अश्रू अनावर झाले. उदयनराजेंनी आसवांना वाट मोकळी करून देतानाच हात जोडले.
मतदारांना वाकून नमस्कार केला. उदयनराजे वाकून नमस्कार करत असताना पंकजा मुंडे त्यांना नको नको म्हणत होत्या. उदयनराजेंच्या या कृतीने अनेकांना गलबलून आलं. स्वत: पंकजा मुंडे यांनाही अश्रू अनावर झाले. त्यामुळे सभेला आलेले नागरिक काही काळ स्तब्ध झाले होते.
चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. त्यानिमित्ताने बीडमध्ये पंकजा मुंडे यांची मोठी सभा झाली. या सभेला स्वत: उदयनराजे भोसले आले होते. अजित पवार आले होते. अजित पवार यांच्या तडाखेबंद भाषणानंतर उदयनराजे यांनी भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी मिश्किल टिप्पणीही केली. अजितदादा आणि इतर वक्त्यांनी सर्व काही बोलून टाकलं आहे. विकास कामांची माहिती दिली आहे. माझ्यासाठी काहीच ठेवलं नाही. आता मी काय बोलू? असं उदयनराजे म्हणाले तेव्हा एकच खसखस पिकली.
पंकजाने हात पसरून मतं मागायची?
कॉलेजमध्ये असताना… जेव्हा आपण एखादं लांबलाचक भाषण करतो तेव्हा पाहिल्याच टाळ्या आणि शिट्ट्या होतात. तुम्ही टाळ्या आणि शिट्ट्या वाजवल्या ना समजायचं आपण उरकतं घेतलं पाहिजे, अशी मिश्कील टोलेबाजी उदयनराजे यांनी केली. माझे वडील, माझं काळीज, माझे मित्र गोपीनाथ मुंडे यांना वंदन करतो. ( असं बोलताना त्यांचा कंठ दाटला) मघाशी अजितदादा बोलले. पंकजाताई बोलल्या. एक लक्षात घ्या, त्या काळात शिवाजी महाराजांनी कोणता जातीभेद मानला होता. तुम्हाला माहीत नसेल तर ऐका. मुंडे कुटुंबाचं कुलदैवत शिखरशिंगणापूर. कामानिमित्त ते इथे आले. हे मला मुंडे साहेबांनी सांगितलं होतं. त्यावेळी कारखानदारी नव्हती. ऊसतोड कामगार होते. ते लढले आणि झटले. जगले. असं असताना आज कजाने तुमच्याकडे हात पसरून मतं मागायची?, असा सवाल उदयनराजे यांनी केला.
तेव्हा रक्त देणाऱ्याची जात पाहतो का?
आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल होतो. जेव्हा आपल्याला रक्ताची गरज पडते. तेव्हा आपण ब्लड ग्रुप चेक करतो. त्यावेळी हा मराठा आणि तो त्या समाजाचा असा विचार का करत नाही? करतो का असा विचार? कुणाचंही रक्त घेतो ना? तेव्हा रक्त हवं असतं ना. तुमचं आमचं रक्त तसंच आहे. त्यामुळे जातीभेद विसरून जा, असं आवाहनच त्यांनी केलं.
गाठ माझ्याशी आहे
मला का बोलावलं तेच कळत नाही. काही शिल्लकच ठेवलं नाही. हृदयापासून सांगतो. बाय हार्ट… महिला वडीलधारी लोकं. एक लक्षात घ्या. ज्यांनी तुमची काळजी घेतली, त्याची नाही काळजी घेणार तर कुणाची घेणार? पंकजा तुमची काळजी घेणार नाही असं वाटतं का? ती तुमची मुलगी आहे, बहीण आहे. तिला मतदान नाही करायचं तर कुणाला करायचं? एक सांगतो. तुम्ही जर मतदान केलं नाही ना, मी राजीनामा देईन आणि तिला साताऱ्यातून निवडून येईल. पण तसं होत नाही, नीट ऐका. या हॉलला गेट आहेत. पंकजाला मतदान करणार म्हणा तरच बाहेर सोडणार. त्यांच्यासाठी नाही करायचं तर कुणासाठी करायचं? तिला संधी मिळायला हवी की नाही? कधी मिळणार संधी? काळ्याचे पांढरे झाल्यानंतर? जेव्हा ती काही करू शकणार नाही तेव्हा निवडून देणार का? आता नाही निवडून दिलं तर माझ्याशी गाठ आहे, असा मिश्किलपणे इशाराच त्यांनी दिला.
आता वाकून नमस्कार करतो
कृपया माझ्या बहिणीला निवडून द्या, असं आवाहन करताना त्यांनी हात जोडले. त्यांचा कंठ दाटून आला होता. डोळ्यातून अश्रू येत होते. आता पेंगा पण मतदानाच्या दिवशी पेंगू नका. वाकून नमस्कार करतो. नाही तर छळायला मी येणारच आहे, असंही ते म्हणाले.
मुंडेंनी माझं बोट धरलं
माझे वडील वारल्यानंतर कोण नव्हतं बोट धरायला. गोपीनाथ मुंडे यांनी माझं बोट धरलं. (असं म्हणताना उदयनराजे ढसाढसा रडले) माझ्या गळ्याची शपथ आहे. तुम्हाला महाराजांची शपथ आहे. कुणी कायपण बोललं तर विश्वास ठेवू नका. हिला देणार ना निवडून. की नेऊ माझ्यासोबत? मी राजीनामा देतो आणि तिकडून निवडून आणतो. मग बघतोच तुमच्याकडे, असंही ते म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.