सांगली : महाराष्ट्रासह कर्नाटकातील विविध ठिकाणांहून दुचाकी चोरणाऱ्या तिघांच्या आंतरराज्य टोळीला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक गुन्हा उघडकीस आणत ११.५० लाख रूपयांच्या १९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या टोळीकडून दोन्ही राज्यातील आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विजय पुंडलीक माने (वय ४०, रा. दानोळी, ता. शिरोळ), मुऱ्याप्पा नरसिंग हाबगोंडे (वय ३०, रा. जिरग्याळ, ता. जत, जि. सांगली), अन्सार अक्रम बुरान (वय २१, रा. कागवाड, जि. बेळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सांगली शहर परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्यांना शोधून त्यांना अटक करण्याच्या सूचना उपअधीक्षक जाधव, शहरचे निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार शाखेचे पथक शहरात गस्त घालत होते.
त्यावेळी सांगली-कोल्हापूर रस्ता परिसरातील आकाशवाणीजवळ तिघेजण चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी आल्याची माहिती पथकातील संतोष गळवे यांना मिळाली. नंतर पथकाने या परिसरात सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील मोपेड (क्र. एमएच १० एपी १३५६) बाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटकातून एकूण १९ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या ११.५० लाखांच्या १९ दुचाकी जप्त करण्यात आल्या.सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, शहरचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक महादेव पवार, संदीप पाटील, सचिन शिंदे, मच्छिंद्र बर्डे, संतोष गळवे, गौतम कांबळे, गणेश कांबळे, संदीप कुंभार, योगेश सटाले, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.