Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख होऊ शकतात :, प्रकाश आंबेडकर

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख होऊ शकतात :, प्रकाश आंबेडकर 


मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे  अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत  अनेक राजकीय अंदाज बांधताना, गौप्यस्फोटांची मालिकाही केली. सध्याची राजकीय स्थिती बघता मनसे अध्यक्ष राज ठाकरे  हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे  अध्यक्ष होऊ शकतात, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. प्रकाश आंबेडकर यांच्या तोंडी परीक्षेचा संपूर्ण भाग आज रात्री 9 वाजता तुम्ही एबीपी माझावर पाहू शकता.

तोंडी परीक्षा कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांना शिवशक्ती-भीमशक्ती युतीबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. सध्या भाजपने राज ठाकरे यांना प्रचारात उतरवून भविष्याचा गेम प्लॅन केल्याचं दिसतंय असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध राज ठाकरे यांची शिवसेना असा संघर्ष भविष्यात उभा राहू शकतो. त्यावेळी ती सर्वायव्हलची अर्थात अस्तित्त्वाची लढाई असेल, असं प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केलं.

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

मला कुठेतरी जाणवायला लागलं आहे,की एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे सध्या अध्यक्ष जरी असले तरी नजीकच्या काळात राज ठाकरे हे अध्यक्ष होतात का? जी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, त्या शिवसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे होऊ शकतात. आफ्टर लोकसभा आणि बिफोर विधानसभा म्हणजेच लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे हे मनसे  विलीन करुन अध्यक्ष होणार का किंवा शिवसेना पक्षप्रमुख पद हे राज ठाकरे यांच्याकडे जाणार का हे मला जाणवायला लागलं आहे. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कात भाषण करुन आपण शिवसेनेचे अध्यक्ष होणार नाही हे जरी सांगितलं असलं तरी त्याचा अर्थ होय असा आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

भाजपचा जो गेमप्लॅन आहे तो समजला पाहिजे. मोदी म्हणाले उद्धव ठाकरेंची परिस्थिती वाईट झाली तर आम्ही त्यांना मदत करु असं म्हणत त्यांनी गाजर दाखवलं आहे. दुसऱ्या बाजूने एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांना भाजपने प्रचारात घेऊन, हळूवारपणे मेन रजिस्टर्ड अर्थात नोंदणीकृत शिवसेना पक्ष जो एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, ती शिवसेना देण्याचा घाट तरी घातला नाही ना असा प्रश्न आहे. यावर सर्व्हायवल कोणाचं राहणार,जसं इंडिकेट सिंडिकेट काँग्रेस झाली होती त्यावेळी इंदिरा गांधींची काँग्रेस वाचली. अशा परिस्थितीत उद्या राज ठाकरे अध्यक्ष झाले तर ते आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना अशी सर्वायवलची चुरस लागेल. त्या चुरशीत कोण तग धरेल, हे बघावं लागेल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मनोज जरांगे यांच्यासोबत विधानसभेला युती शक्य

दरम्यान, यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्यासोबतच्या युतीवरही भाष्य केलं. लोकसभा निवडणुकीत आम्ही मनोज जरांगे यांना युतीचा प्रस्ताव दिला होता, पण सध्या ती युती होऊ शकली नाही. पण विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीची युती होऊ शकते, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.