सांगली : एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीने ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांना 'एप्रिल फूल' केले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज अपक्ष उमेदवार तथा काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आंबेडकरांनी सांगली मतदारसंघात तिसऱ्यांदा 'यू-टर्न' घेतला आहे.
चंद्रहार पाटील यांनी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांचे पहिले प्राधान्य वंचित बहुजन आघाडीला होते. भाजपकडून खासदार संजय पाटील आणि काँग्रेसकडून विशाल पाटील लढतील आणि 'वंचित' चंद्रहार यांना उमेदवारी देईल, असे चित्र होते. १० मार्च रोजी त्यावर बोलणी झाली आणि त्याच रात्री ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीचे संकेत दिले.दुसऱ्या दिवशी म्हणजे ११ मार्च रोजी दुपारी ३ वाजता चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आंबेडकरांना धक्का दिला. चंद्रहारने फसवले, याचा जाहीर राग आंबेडकरांनी व्यक्त केला. त्यानंतर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ॲड. आंबेडकरांची भेट घेतली. त्यांनी शेंडगे यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघात 'ट्विस्ट' येईल, असे चित्र निर्माण झाले.
तोवर विशाल पाटील यांच्या उमेदवारीसमोर संकट उभे ठाकले, त्यांनी बंडाचा निर्णय घेतला आणि माजी राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी ॲड. आंबेडकर यांची भेट घेऊन विशाल यांना पाठिंबा मागितला. 'तुम्ही उमेदवारी ठेवली तर जाहीर पाठिंबा देईन,' असे त्यांनी स्पष्ट केले. विशाल यांनी उमेदवारी ठेवली, बंड केले आणि आता आंबेडकरांनी त्यांना पाठिंबा जाहीर करताना तिसऱ्यांना 'यू-टर्न' घेतला आहे. त्यांनी प्रकाश शेंडगे यांना धक्का देत त्यांचा पाठिंबा काढून घेतला आहे. आंबेडकर हे एका ओबीसी नेत्याचा पाठिंबा काढून घेणार नाहीत, असा विश्वास प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केला होता. त्याला धक्का बसला.
वेगळ्या समीकरणांत 'वंचित'चा प्रभाव किती?
वंचित बहुजन आघाडीचा सांगली लोकसभा मतदारसंघात प्रभाव आहे. तो सन २०१९ च्या निवडणुकीत दिसून आला होता. गोपीचंद पडळकर यांना ३ लाख मते मिळाली होती. अर्थात, यामागे धनगर समाजातील उमेदवारी, एमआयएम पक्षाचा पाठिंबा आणि सोबतीला आंबेडकरी जनतेची साथ असे गणित होते. या वेळी जातीय समीकरणांचा फारसा गोंधळ नाही. तीन पाटलांत लढत होत आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा नेमका किती लाभ विशाल यांना होतोय, याकडे लक्ष असेल. अपक्ष उमेदवारी दाखल करताना एका मोठ्या संघटनेचा, पक्षाचा पाठिंबा हा विशाल यांचे बळ नक्कीच वाढवणारा आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.