घरावरील गोळीबार प्रकरणानंतर अभिनेता सलमान खान बराच चर्चेत आहे. पोलीस अजूनही या प्रकरणाचा तपास करत असून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडूनही सलमानला वारंवार धमक्या मिळत आहेत. पुढच्या वेळी घरावर गोळी चालवली जाणार नाही अशी धमकी सलमानला देण्यात आली आहे.
यानंतर सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने बिश्नोई समाजाची माफी मागितली होती. तिच्या या माफीनंतर अखिल भारतीय बिश्नोई सोसायटीचे देवेंद्र बुडिया यांनी सोमवारी मोठी घोषणा केली. १९९८ सालच्या काळवीट शिकार प्रकरणात बॉलीवूड अभिनेता सलमान खानने माफी मागितल्यास त्याला माफ करण्याचा विचार करू, असं त्यांनी म्हटलं आहे.मागच्या आठवड्यात सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने बिश्नोई समाजाची माफी मागितली. "त्याच्याकडून चूक झाली असेल तर मी त्याच्या वतीने माफी मागते, प्लीज त्याला माफ करा. कोणाचा जीव घेणं मान्य नाहीच, मग तो सलमान असो वा कोणी सामान्य माणूस," असं म्हणत सोमीने सलमानला माफ करण्याची विनंती बिश्नोई समाजाला केली होती. गेल्या काही काळापासून सलमानला लॉरेन्स बिश्नोई गॅंगकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर तिने बिश्नोई समाजाची माफी मागितली.
बिश्नोई समाजाचे अध्यक्ष देवेंद्र बुडिया यांची प्रतिक्रिया
सोमीच्या या माफीनाम्यानंतर बिश्नोई समाजाचे अध्यक्ष देवेंद्र बुडिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले," सलमानने स्वतः माफी मागितल्यास बिश्नोई समाज त्याच्या माफीचा विचार करेल. कारण ती चूक सोमी अलीने केली नव्हती, तर सलमानने केली होती. त्यामुळे त्याने माफीचा प्रस्ताव बिश्नोई समाजापुढे ठेवायला हवा. त्याने मंदिरात येऊन माफी मागावी आणि भविष्यात कधीच अशी चूक करणार नाही, तसेच वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नेहमी काम करणार, अशी शपथ त्याने घेतली पाहिजे. सलमानने असं केल्यास समाजातील लोक एकत्र येऊन त्याला माफ करण्यासंदर्भात निर्णय घेतील" देवेंद्र यांच्या या वक्तव्यवावर सलमान नेमकी काय प्रतिक्रिया देणार याकडे त्याच्या चाहत्यांच लक्ष लागून राहिलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
सप्टेंबर 1998मध्ये 'हम साथ साथ है' या सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान जोधपूरजवळील मथानिया येथील बावड या ठिकाणी काळविटाची शिकार केल्याचा आरोप सलमानवर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी अभिनेत्री तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर सलमानला पाच वर्षं सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.