शासकीय रुग्णालयात प्रसूतींचे प्रमाण वाढवा
सांगली : बालस्वास्थ्य कार्यक्रमात जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. याचगतीने आरोग्य विभागाने कामे करावीत. शासकीय रुग्णालयांत प्रसूतींचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. जिल्हा परिषदेत एकात्मिक आरोग्य व कुटुंबकल्याण समितीच्या नियामक मंडळाच्या सभेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमात २०२३-२४ या वर्षात २६१ बालकांच्या हृदयशस्त्रक्रिया करण्यात आल्या. ४ हजार २५० अन्य शस्त्रक्रिया झाल्या. यामुळे जिल्हा राज्यात द्वितीय क्रमांकावर आला.
धोडमिसे म्हणाल्या, आरोग्य उपक्रमांच्या १११ कार्यक्रम निर्देशांकात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय वाघ म्हणाले, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य व पंतप्रधान जनआरोग्य योजनेतून तीन महिन्यांत १० हजार २० शस्त्रक्रिया करण्यात आल्या. कर्करोगाच्या सर्वाधिक म्हणजे ७९ हजार ८५१ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. लोकसंख्येनुसार सांगली जिल्हा महात्मा फुले योजनेत प्रथम क्रमांकावर आहे. स्मार्ट पीएचसी हा उपक्रम राज्यभरात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सांगली जिल्ह्यत आरोग्य व्यवस्थेत अमूलाग्र बदलासाठी व्हिजन सांगली उपक्रम राबविण्यात येणार आहे.
सभेला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रम कदम, अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे, माता बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील, कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ. शिवाजी आलदार उपस्थित होते. इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयाने कायाकल्प कार्यक्रमात राज्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अभिनंदनाच ठराव सभेत मंजूर करण्यात आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.