सांगली : अभियांत्रिकी क्षेत्रात 'वालचंद'चा दबदबा आहे. आता यापुढची वाटचाल महाविद्यालयाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी असेल. त्यासाठी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे रुपांतर 'वालचंद तंत्रज्ञान विद्यापीठ' करण्याचा मानस आहे.
येत्या तीन वर्षांत याबाबत गतीने काम होईल, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्रशासकीय परिषदेचे अध्यक्ष (ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कौन्सिल) अजित गुलाबचंद यांनी दिली. महाविद्यालयातील आरंभ दिनाच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
गुलाबचंद म्हणाले, 'महाविद्यालयाच्या प्रगतीचा पुढचा टप्पा 'वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी' असे तंत्रज्ञान विद्यापीठ करण्याचा आहे. ही संस्था केवळ 'आयआयटी'सारखी नाही तर, त्याहीपुढे जाणारी असेल. ज्या पद्धतीने 'निकमार' युनिव्हर्सिटीचे काम होते, त्या दर्जाचे शिक्षण देण्याचे काम यापुढच्या काळात वालचंदमध्ये होईल. उदाहरण सांगायचे झाल्यास परदेशात रस्ते देखभाल दुरुस्तीसाठी कंपन्या आहेत. त्याप्रकारच्या कंपन्या भारतात नाहीत आणि मनुष्यबळही नाही. ते निर्माण करण्याचे काम विद्यापीठांचे आहे. त्याचाच भाग म्हणून यापुढच्या काळात परदेशी विद्यापीठांशी करार करुन ज्ञानाचे आदान-प्रदान केले जाईल.''संस्थेचा विस्तार करण्यासाठी काही नवे अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहेत. यात 'युजी'चे रोबोटिक ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजेन्स ॲण्ड मशीन लर्निंग हे दोन अभ्यासक्रम विनाअनुदानित तत्वावर सुरु करण्यात आले आहेत. 'पीजी'साठी कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे, असे संचालक डॉ. उदय दबडे यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला परिषदेचे सदस्य चकोर गांधी, अमोल चव्हाण, दीपक शिंदे, माजी विद्यार्थी संघटनेचे श्रीनिवास पाटील, संचालक डॉ. उदय दबडे, चिदंबरम कोटीभास्कर, आर्किटेक्चर प्रमोद चौगुले, मुकुल पारीख, कार्पोरेट रिलेशन्सचे अधिष्ठाता प्रो. संजय धायगुडे यांची उपस्थिती होती.
आता अडचणी आणू नयेत
संस्थेपुढे मागच्या काळात काहींनी अडचणी निर्माण केल्या होत्या. मुलांच्या शिक्षणाचे त्यांना काही पडले नव्हते. उच्च न्यायालयाच्या निकालाने पुन्हा संस्थेच्या प्रगतीची दरवाजे उघडले आहेत. ज्यांनी पूर्वी अडथळे आणले, त्यांनी यापुढे आणू नयेत, असे आवाहन अजित गुलाबचंद यांनी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.