सांगली : खरेदी केलेल्या जमिनीची पलूसच्या तलाठ्यांनी घेतलेली नोंद मंजूर करण्यासाठी ७ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना पलूसच्या मंडल अधिकाऱ्यांच्या मदतनिसाला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.
लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाल्याने मंडल अधिकाऱ्यासही ताब्यात घेण्यात आले. मंडल अधिकारी तानाजी शामराव पवार (वय ५२, रा. पवार गल्ली, कणेगाव, ता. वाळवा) आणि मदतनीस प्रसाद गजानन चव्हाण (वय ५४, रा. आमणापूर रस्ता, बुर्ली, ता. पलूस) अशी संशयितांची नावे आहेत.
तक्रारदाराच्या मित्राने खरेदी केलेल्या जमिनीची पलूसच्या तलाठ्यांनी घेतलेली नोंद मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी तानाजी पवार याचा मदतनीस प्रसाद चव्हाण याने तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागास प्राप्त झाली. अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली असता त्यामध्ये तथ्य असल्याचे आढळले. दरम्यान, तडजोडीत लाचेची रक्कम ७ हजार ५०० रुपये देण्याचे ठरले.मंगळवार, दि. १४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तहसील कार्यालय आवारात सापळा लावला. तेथे मदतनीस प्रसाद चव्हाण याने तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारली. त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. तपासात लाच स्वीकारण्यास मंडल अधिकारी तानाजी पवार याने प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. संशयितांविरोधात पलूस पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.